Tuesday, May 21, 2024
Homeइतरनिवडणूक आयोग बनले भाजपाचे प्रचारक - सतिश काळे

निवडणूक आयोग बनले भाजपाचे प्रचारक – सतिश काळे

शहरात अनेक ठिकाणी भिंतींवर भाजपचे कमळ

 पुणे – आचारसंहितेत निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमाचा भंग होत आहे पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी गल्लोगल्लीत भाजपाचे कमळ चिन्ह भिंतीवर उमटलेले आहेत. ते हटविण्याकडे महापालिका दुर्लक्ष करत आहे. तर निवडणूक आयोग मेहरबान होत आहे. यंदाच्या निवडणुकीत निवडणूक आयोग हेच भाजपाचे प्रचारक बनले असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला. 

सतीश काळे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. उमेदवार निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. राजकीय पक्षांकडून उमेदवार देखील आत्ता निश्चित केले आहेत. निवडणुकीची घोषणा करताना निवडणूक आयोगाने आचारसंहिता देखील लागू केली आहे. यामध्ये काही नियम घालून देण्यात आले. या मध्ये राजकीय पक्षांनी आपले बॅनर, पक्षाच्या नावाचे चिन्ह, भिंतीवर चिन्ह काढून प्रचार करणे आदींवर बंदी घालण्यात आली आहे. हा नियम सर्वच पक्षांना, त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर लागू असला पाहिजे. मात्र भाजपाला या नियमांचा विसर पडला असल्याचे दिसत आहे. निवडणूक आयोग आपले घरगडीच असल्याच्या आविर्भावात ते वावरत आहेत. त्याचाच एक प्रत्यय पिंपरी चिंचवड शहरात येत आहे.

 शहरात भाजपाकडून आचारसंहितेच्या नियमांचा भंग केला आहे. या बाबतच्या असंख्य तक्रारी सामाजिक संघटना, राजकीय पक्षांनी केल्या आहेत. त्या तक्रारी होऊनही शहरात विविध ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कमळ चिन्ह उघड वापरणे सुरु केले आहे. पिंपरी चिंचवड शहरात सार्वजनिक ठिकाणी, गल्लोगल्लीत भिंतीवर कमळ चिन्ह उमटवले आहे. ते काढण्याचे काम महापालिकेचे आहे. मात्र भाजपच्या लोकांपुढे महापालिका देखील नतमस्तक होत आहे कि काय असा सवाल नागरिकांमध्ये आहे. तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रारींचा सपाटा सुरु असताना देखील हा विभाग कारवाईकडे कानाडोळा करत आहे. निवडणूक आयोगच भाजपाचा प्रचार करत आहे, असा आरोप काळे यांनी केला.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!