Monday, November 4, 2024
Homeसाहित्य/सामाजिकचला व्यक्त होऊ या?खरचं….काळाच्या ओघात मामाचा गाव हरवलय की नात्यातील ओढ … की काळ बदलालय…

खरचं….काळाच्या ओघात मामाचा गाव हरवलय की नात्यातील ओढ … की काळ बदलालय…

‘झुक झुक झुक आगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहू या, मामाच्या गावाला जाऊ या’.. पूर्वी शाळांना उन्हाळय़ाच्या सुट्टय़ा लागताच मुलांना मामाच्या गावाला अर्थात ‘आजोळी’ जायची ओढ लागत असे.मामाच गाव संस्कार केंद्र होत, आई ‘माहेरी’ आणि मुलं ‘आजोळी’ जायची आता मात्र सर्व हरवत चाललय की काय ? की आपण बदलतोय की… आपल्याच नात्यापासून लांब जातोय……. की बदलत्या जीवन शैलीने आपल्याला बदलायला भाग पाडलंय…..

आज मुलांना आपण सर्वकाही पैशाने विकत घेऊन देऊ शकतो हा गैरसमज आणि नात्यांची विन घट्ट आहे की व्यावहारिक जगात हरवते आहे याचा शोध घेत मामाच्या गावच्या आठवणी व त्यातून मिळणारी संस्कार शिदोरी काही अजब रसायन नव्या पिढीला मिळेल का ??

‘झुक झुक झुक आगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहू या, मामाच्या गावाला जाऊ या’.. पूर्वी शाळांना उन्हाळय़ाच्या सुट्टय़ा लागताच मुलांना मामाच्या गावाला अर्थात ‘आजोळी’ जायची ओढ लागायची. आजी आजोबा आणि मामाही भाचेकंपनीच्या स्वागतासाठी तयार असे; परंतु बदलत्या काळात जीवन शैली बदलत गेलीय, उन्हाळ्यात बाहेर फिरायला जायची फॅशन आली आणि मामाची गावे परकी झाली आहेत. ज्यांच्याकडे पैशाला कमी नाही अशांनी हवे त्या पर्यटनस्थळी जावे, हॉटेलमध्ये राहावे व मनसोक्त बागडण्याचा आनंद घ्यावा, असे चित्र दिसू लागले असून मामाच्या गावाची जागा पर्यटन स्थळांनि घेतली असून सुगरण मामीच्या हाताच्या जेवणाची जागा आता हॉटेल मधील मेन्युंनी घेतली आहे तर मामाच्या घराची जागा अत्याधुनिक हॉटेलांनी घेतली आहे.

उन्हाळ्यात घरात बसून किंवा मैदानाात जाऊन खेळणारे पारंपरिक खेळ आज खेळले जात नाहीत.पूर्वी उन्हाळय़ाच्या सुट्टय़ा हव्याहव्याशा वाटत असत, परंतु आता सुट्टय़ा आल्या की काय करावे, हा प्रश्न निर्माण होतो. पूर्वी उन्हाळय़ाच्या सुट्टय़ा लागताच घरा-घरात अडगळीत पडलेले बुद्धिबळाचे पट, कॅरम बोर्ड व सागर गोटया, चल्लासाठ खेळत हात लाल होईपर्यंत खेळ व्हायचा परंतु बदलत्या काळात संगणक व ‘व्हिडीओ गेम’चाच बोलबाला अधिक असून शहरी भागात सर्वच वयोगटांत याच वस्तू प्रिय झाल्याचे चित्र असले तरी भार नियमनाचा तडाखा बसलेल्या ग्रामीण भागात मात्र इलेक्ट्रॉनिक सेलवरील गेम, मोबाईल गेम खेळण्याकडे अधिक कल आहे.

  ग्रामीण भागातही क्रीडा आणि व्यक्तिमत्त्व शिबिरांचे पेव आले असून पालक अशा शिबिरांमध्ये मुलांना गुंतवून ठेवीत असतात. पूर्वीच्या लंगडी, लगोरी ,सुरपारंबी, लंगोरचा इत्यादी खेळांना कधीचीच सोडचिठ्ठी दिली आहे. सापसिडीसारखे घरात बसून खेळणारे खेळ आता मोबाईलवर लुडो गेम  खेळले जात आहेत. काळाच्या ओघात उन्हाळय़ातील खेळ आता इतिहास जमा झाले आहेत. पूर्वी चार मुलांनी एकत्र जमायचे, बुद्धिबळ, कॅरम किंवा सापशिडीत मन रमवायचे. यातून बालमित्र अधिकाधिक जवळ येत असत. त्यातून एक प्रकारचे भावनिक नाते निर्माण होऊन ते संबंध आयुष्यभर जपले जायचे. पूर्वी मामाही आपल्या भाच्यांना आग्रहाने बोलावीत तर कधी स्वत:हून घेऊन जात असत. आब्यांचा रस करण्यासाठी मामा ढीगभर आंबे आणायचे. भरपेट जेवण झाल्यानंतर मुले वेगवेगळे खेळ मांडून जे बसायचे आणि ऊन उतरल्यानंतरच बाहेर पडायचे. परंतु आता त्या खेळांना मुले पसंत करीनासे झाले आहेत. शहरी भागात व्हिडीओ गेम आणि ग्रामीण भागात सेलवरील इलेक्ट्रॉनिक गेम, मोबाईल गेम खेळण्यावरच सध्याभर दिसतो.

शालेय आणि महाविद्यालयीन मुलांना क्रिकेटचे वेड लागले आहे. त्यामुळे उन्ह उतरताच मुले घरोसमोर किंवा मोकळ्या मैदानात जाऊन क्रिकेटचा आनंद घेत असतात. जी मन:स्थिती मुलांची झाली आहे तीच मुलींची झाली आहे. पूर्वी ठिकठिकाणी मुली लंगडी खेळताना दिसत असत. आता मात्र मुलींना लंगडी काय किंवा टिक्कर बिल्ला काय, हे माहीतही नाही. आजची मुले वाचनालयात जाऊन कोणतेही पुस्तक घरी आणत नाहीत. वाचन संस्कृतीच हरवल्यामुळे बहुतेक घरी साहित्य, संस्कृती यावर चर्चाच होत नाही. पाठांतर नावाचा प्रकारच मागे पडला असल्याने पहाट कोणालाच माहीत नाही. टीव्ही पाहात रात्री उशिरापर्यंत जागायचे अन् ऊन अंगावर आले की उठायचे. दिवसभर एकलकोंडे व्हिडीओ, मोबाईल गेम खेळायचे अन् आला दिवस ढकलायचा असेच वातावरण सर्वत्र दिसून येत आहे. याला काहीजण अपवादही असू शकतात. जसा काळ बदलत आहे त्याप्रमाणे जीवनमानही बदलत आहे. जुने खेळ लोप पाऊन नवीन नवीन खेळ पुढे येत आहेत. असे असले तरी आजही आपल्या नातवाने उन्हाळय़ाच्या सुट्टीत मामाच्या गावाला जावे, अशी बहुतांश आजीची इच्छा आहे. परंतु काळाच्या ओघात मामा-भाच्यांच्या प्रेमाला कुठेतरी सीमा येत असल्याचे चित्र समोर येत आहे.

       मुलांना हक्काचे मामाचे घर होते. पण, काळाच्या ओघात आता मात्र हे मामाचे घर हरवले असल्याचे दिसून येते. मुलांना सुट्या लागल्या, की पहिली आठवण व्हायची ती मामाच्या गावाची...  सुटीत जायची ती हक्काची जागा. पण, आजच्या तंत्रयुगात मात्र टीव्ही, मोबाईलमध्ये रमलेली बच्चेकंपनी मामाचा गाव विसरली आहे. ग्रामीण भागातल्या मुलांनाही सुट्यांमध्ये मामाच्या गावाला जायची पूर्वीची गंमत आता राहिलेली नाही.  
 आई ‘माहेरी’ आणि  मुलं ‘आजोळी’ जायची. लेकरांना   आजी-आजोबांच्या प्रेमाचा लळा आणि धाक असायचा. आता चित्र बदलले. विभक्त कुटुंबामुळे ‘माहेरी’, ‘आजोळी’ हे शब्द इतिहासजमा झाले. मामाच्या गावी डेरेदार झाडांच्या आत कौलारू घर, प्रशस्त अंगण, झोपाळा, गुरांचा गोठा, बैलगाडी, नारळ, पोफळीची वाडी,  विहीर, आंबे, फणस, करवंदाची रेलचेल.  साजूक तुपातला मऊ भात आणि सांडगे, कुरडई  पापड,  गाडीवरचा बर्फाचा गोळा अस बरच काही असायचं पण आता गाव बदलल, सुधारल. डांबरी रस्ते, दळणवळणाची साधने वाढलेली. 

आज मामा आहे, पण मामाचा गाव राहिला नाही. ‘समर व्हेकेशन’मध्ये मुलांना सहलीला जायचे असते. गावात जाऊन असं शेणमातीत खेळणं आता आई-वडिलांनाच नको वाटतंय. आणि तेच त्यांनी मुलांमध्ये उतरवलंय. गावात जाऊन अशी मस्ती करणं आता डाऊनमार्केट झालंय. माहिती तंत्रज्ञानाच्या आणि दहा मिनिटांत ‘पिझ्झा’च्या जगात सर्व गोष्टी आताच हव्या असतात. आणि नाही मिळाल्या तर मुलांची चिडचिड होते. सुट्टीतला आनंदाचा संस्कार मुलं मिस करतात. रानमेवा एकमेकांसोबत वाटून खाणं, शेअर करणं यामुळे ‘व्यक्तिमत्त्व विकास’ होतो.सामूहिक भावना वाढीस लागते. आपली पिढी हे नैसर्गिक संस्कार मिस करते. सॉफिस्टीकेटेड आई-बाबांनाच जुन्या गोष्टींना महत्त्व द्यावेसे वाटत नाही आणि पर्यायाने कळत-नकळत मिळणाऱ्या अनोख्या आनंदाला ‘टीमवर्कला’ ही मुलं पारखी होतायेत.

मामाच्या गावी मामेभाऊ व इतर नातेवाइकांबरोबरच्या गप्पांमधूनच करमणूक होई, पण त्यातून जीवनाला उपयोगी पडणारी शिदोरी मिळे. त्याचप्रमाणे एकमेकांजवळ सुखदुखे मोकळी केल्याने मनावरचा ताण कमी होई. कुटुंबं मोठी असायची. सगळे बरोबरीचे असल्याने एकमेकांसोबत खेळ, खाऊ, भांडणे यातही मजा होती. रुसवा-फुगवा काढणारी प्रेमळ मामी असायची. आता बहुतेक माम्या कामवाल्या आहेत. महागाई, विभक्त कुटुंब यामुळे माणसं दुरावली आहेत. स्वत:तच जास्त रमलीत. पायाला चाकं आणि मनगटावर घडय़ाळ यातच दिवस संपतो. संवाद हरवलाय. वाटून खाणे, नात्यातला समजूतदारपणा, मिळून-मिसळून राहणे, महागडय़ा फीशिवायचा संस्कारवर्ग आजच्या मुलांनी गमावलाय.’’

  आठवणी.. कधी रम्य भूतकाळाच्या.. कधी मोरपिसी.. सुखद आनंद देणाऱ्या.. कधी अनोख्या विश्वाची सफर घडविणाऱ्या.. तर कधी आयुष्यभर शिदोरीसारख्या पुरून उरणाऱ्या..! मामाचा गावही तसाच..! आठवणीतला.. प्रेमाचा ओलावा असणारा! नात्यांची वीण घट्ट करणारा.. कोणत्याही संस्कार वर्गात न जाता कळत न कळत संस्काराची खाण देणारा.. आणि नेहमीच हवाहवासा वाटणारा..!

आज हा निर्व्याज प्रेम देणारा ‘मामाचा गाव हरवला का?’ की मामाचा गाव आहे.. पण तिथे माणसंच नाहीत? की नातीच घट्ट नाहीत? की.. आपल्या आवडीनिवडी बदलल्या.. सुट्टीकडे बघण्याचे संदर्भ बदलले?.. की आपण सद्य:स्थिती आणि वास्तव स्वीकारले..?
मामाचा गाव म्हणजे.. समृद्ध निसर्ग.. सुगरण मामीच्या हातची मेजवानी.. आजीचा प्रेमळ हात.. आणि आजोबांचा धाक..! आज हे सगळं ऽऽ आहे की.. हरवलंय?
आज काळ बदलला. मुलांची सुटी, त्यांच्या बरोबरीच्या मुलांबरोबरच जावी ही नोकरदार पालकांची इच्छा. एकमेकांत मिसळण्याची-वागण्याची सवय, सहकार्य, सहभोजन, संस्कृतीची देवाण-घेवाण याचा फायदा होतो. पण या संस्कारासाठी आता पैसे मोजावे लागतात.

आजकाल मुलांना सुटीत कुठे गुंतवायचे, हा पालकांसमोर प्रश्न पडतो. विभक्त कुटुंबामुळे समृद्ध आजोळ मुलांपासून हिरावून घेतलंय. दरवर्षी एकाच ठिकाणी जायला मुलं कंटाळतात. मग छंद वर्गात मुलांना गुंतविण्याचा प्रयत्न पालक करतात.
‘‘गाण्यातली आगगाडी आणि मामाचा गाव या गोष्टी काळाच्या प्रवाहात मागे पडल्या. खिडकीतून मागे पळणाऱ्या झाडांप्रमाणे, गावाप्रमाणे याला जबाबदार आपण आहोत, कारण भौतिक सुखाच्या मागे धावताना आपण निसर्ग आणि कुटुंबव्यवस्था यांची वाताहत केली आहे. त्यामुळे गाव आहे पण गावात पाणी नाही. महागाईमुळे नोकरीसाठी मामीलाही घराबाहेर पडावे लागले. गावाला जाताना प्रवासातले खाचखळगे, ट्रॅफिक जाम, रिझव्‍‌र्हेशन यामुळे मामाचा गाव स्वप्नातला होतो आहे. हे बदलायला हवे. मामावर आर्थिक ताण पडणार नाही ना याची काळजी घेऊन गावात सौर ऊर्जेचा वापर करून पाझर तलाव बांधून, हिरवाई जागवून नवीन उद्योग सुरू करायला हवेत. त्यामुळे मामाला गावही सोडायला लागणार नाही व गावचे सौंदर्यही टिकेल.’’

सर्वाजवळ असलेला पैसा व त्यामुळे करता येणारी मौजमजा. आई-बाबांनाही पर्यटनाला जायचं असतं. सोबत नातलगही असतात. पण आपलेपणाची सर कशातच नाही. एकमेकांबद्दल वाटणारा जिव्हाळा कमी झालाय.

आत्ताच्या मुलांचा मामाचा गाव हरवला नाही तर तो स्थलांतरित झालाय. कुणाचा मामा शहरात गेलाय. कुणाचा आयटी जॉबमुळे गर्भश्रीमंत झालाय आणि बहिणीलासुद्धा भावाकडे पाठविण्यापेक्षा एकुलत्या एक मुलाला आयुष्यातली सुखं बहाल करायची आहेत. वर्षांतले दहा महिने पुरत नाहीत म्हणून सुट्टीतल्या दोन महिन्यातही व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे, स्केटिंगचा वर्ग करून गुणवत्ता यादीत वरचं स्थान पटकवायचं आहे. आज कैरीचं पापड लोणचं घालायला कंपन्या आहेत . कार्टुन्स, कॉम्प्युटर गेमची रेलचेल आहे. पैसे फेकले की सेवेला वॉटर पार्क हजर आहे. आणि खेळून थकल्यावर खायला पिझ्झा, बर्गर आहेत. कुठे काय कमी आहे? ढीगभर पोळ्या लाटणारी आजी तेवढी कुठे दिसत नाही.’’

आजचा जमाना २०-२०चा आहे. मुलांचं मन कोणत्याही गोष्टीत फार वेळ रमत नाही, लगेच बोअर होतं. इंटरनेट, फेसबुक सोबत पॉपकॉर्न, केक असतो. कुणाकडे जाण्याचा प्रश्नच नाही. ट्रॅव्हल कंपनीबरोबर टूर केली की झालं आऊटिंग. मुलांचा मामाचा गाव हरवलाय. पण त्याची त्यांना गरजही वाटत नाही. फोन, नेट, फेसबुकमुळे आजची पिढी वेल-कनेक्टेड आहे. मॅक्डोनाल्ड, पिझ्झा हट, डॉमिनो हे सगळे काका, मामा त्यांची खाण्याची हौस पुरवायला सुसज्ज आहेत. याला आपण जबाबदार आहोत. दिवसभर कामानिमित्त बाहेर राहणारे आई-बाबा आणि त्रिकोणी चौकोनी कुटुंबपद्धती. स्पर्धाचे युग असल्याने सुट्टीतही क्लासेस व शिबिरांचे ओझे! सगळ्यांनीच विचार करायला हवा.. कसा देता येईल मुलांना मामाचा गाव..!’’

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!