वन विभागाच्या वतीने डिंग्रजवाडी येथे तातडीने बसवण्यात येणार पिंजरा – प्रताप जगताप वन परिक्षेत्र अधिकारी, शिरूर
कोरेगाव भिमा – दिनांक १७ डिसेंबर डिंग्रजवाडी (ता.शिरूर) येथे दुपारी दोनच्या सुमारास शेतकऱ्यांना बिबट्या दिसला असून येथे पाच – सहा बिबट्यांचा वावर असल्याचे नागरिकांनी सांगितले असून येथील फिरस्त्या कुत्र्यांची शिकार करत आहेत वनविभागाकडून तातडीने पिंजरा बसवण्यात येणार असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
डिंग्रजवाडी येथे बिबट्याचा बिनधास्त वावर मोठ्या प्रमाणात सुरू असून नागरिकांच्या मनात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांना रानातील कामे करताही येत नसून पाण्याची मोटार चालू अथवा बंद करायला जाता येत नाही.
डिंग्रजवाडी येथे बिबट्याच्या बिनधास्त फिरताना एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात फिरत असून सदर व्हिडिओ वन विभागाला पाठवल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
जनावरांना चारा आणणे,शेतीला पाणी देणे,फवारणी, व इतर शेतीची कामे बिबट्याच्या भीतीने करता येत नसून शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे.महिलांना शेतात काम करण्यासाठी जाता येत नाही. येथील काही शेतकऱ्यांना जीवावर उदार होऊन शेतातील कामे करण्यासाठी शेतात जावे लागत आहे.