माझा मुलगा परत द्या…वडिलांचा आक्रोश
पिंपरी चिंचवडमधून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. शाळेतील विद्यार्थ्याचा खेळत असताना तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने डोक्याला जोराचा मार लागल्याने मृत्यू झाला आहे. सार्थक कांबळे (वय १४)असं मृत पावलेल्या विद्यार्थ्यांचे नाव असून. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. उपचारासाठी त्याला रूग्णालयात नेण्यात आलं पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला.
माझा मुलगा परत द्या…वडिलांचा आक्रोश – सार्थकला याच वर्षी पिंपरीतील शाळेत शिक्षणासाठी घातलं होतं. यापूर्वी तो काळेवाडीतील शाळेत शिकायचा. माझा मुलगा मला आहे तसा परत ज्या, असा आक्रोश सार्थकच्या वडिलांनी केला आहे. ते म्हणाले की, माझा मुलगा सकाळी मला सांगून शाळेत आला. शाळेत येताना काळजी घ्या आणि नीट कामावर जा, असं म्हणाला. मात्र काही वेळातच मला फोन आला आणि दवाखान्यात यायला सांगितलं. सार्थकला दुखापत झाल्याचं सांगितलं. मात्र सार्थकचा मृत्यू झाला होता. शाळेवर कठोर कारवाई करा आणि माझा मुलगा जसा सकाळी शाळेत आला होता तसाच परत करा, अशी मागणी वडिलांनी केली आहे.
हसत्या खेळत्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू – सकाळी घरी आई-वडिलांशी झालेला संवाद शेवटचा ठरला. त्याच्या अचानक जाण्याने कांबळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घरातलं हसतं-खेळतं मुल गेल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर प्रकरणाचा चिंचवड पोलीस अधिकचा तपास करत आहेत.