तळेगाव ढमढेरे : प्रतिनिधी जालिंदर आदक
कासारी (ता.शिरूर) येथील सौ. हिराबाई गोपाळराव गायकवाड विद्यालयात तब्बल ३६ वर्षानंतर तळेगाव ढमढेरे येथील सुभाष विद्यामंदिरच्या शालेय सवंगड्यांची शाळा भरली. सन १९८४-८५ साली दहावीला असलेल्या तळेगाव ढमढेरे येथील सुभाष विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच कासारी येथे संपन्न झाला.
तब्बल ३६ वर्षानंतर शालेय सवंगडी एकत्र आल्याने सर्वांचेच चेहेरे आनंदी तर काहिशा भांबावलेल्या अवस्थेत होते. माजी विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणीना उजाळा मिळाला. सुमारे १०० माजी विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
सर्वच माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा शाळेचा सुखद अनुभव घेतला. शाळेची घंटा वाजल्यानंतर सर्व माजी विद्यार्थी प्रार्थनेसाठी एकत्र आले. सर्वांनी सामूहिकपणे राष्ट्रगीत व प्रार्थना एक सुरात म्हटली. सरस्वती प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरवात झाली. या कार्यक्रमात सुभाष विद्यामंदिरचे तत्कालीन मुख्याध्यापक अंकुश पठारे यांचा मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुरुजनांचाही यथोचित सत्कार केला. यावेळी गुरुजनानी आपली मनोगते व्यक्त केली. तब्बल ३६ वर्षानंतर विद्यार्थ्यांनी आमची आठवण ठेवली याचा आम्हाला अभिमान आहे.
माजी विद्यार्थ्यांमध्ये उद्योजक, व्यावसायिक, शिक्षण संस्थाचालक, शिक्षक, वकील, डॉक्टर, पोलीस अधिकारी, शासकीय अधिकारी, कंपनीतील अधिकारी, प्रगतशील शेतकरी असा संगम झाला आहे. माजी विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेञात चमकले हिच आमची सत्कारापेक्षाही मोठी गुरुदक्षिणा आहे अशी भावनाही यावेळी बोलताना गुरुजनांनी व्यक्त केली. याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली व जुन्या आठवणी ताज्या केल्या तर आमच्या यशात गुरुजनांचा वाटा मोठा असल्याचेही अनेकांनी सांगितले.
कार्यक्रमाचे नियोजन माजी विद्यार्थी व समता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र ढमढेरे, माणिक काळकुटे, उद्योजक संतोष हबडे, बाळासाहेब दरेकर, सुरेश ढमढेरे, विजय जेधे, प्रकाश तकटे, संतोष गुंदेचा, मच्छिंद्र नरके, उषा भुजबळ, राजाराम साबळे, डॉ. हेमंत दातखिळे, मनोरमा खेडकर, नीलिमा ढमढेरे-थोरात, दिलीप सातपुते, महादू रासकर आदींनी केले. यावेळी सुभाष विद्यामंदिरचे तत्कालीन शिक्षक व सेवानिवृत्त मुख्याध्यापक वि.ल.पाटील, प्रभाकर मुसळे, दत्तात्रय गायकवाड, टेमगिरे सर, सेवक चंदूकाका, कासारी येथील सौ.हिराबाई गायकवाड विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक सरोदे, ज्येष्ठ अध्यापिका नसीमा काझी, राजाराम साबळे, अरुण भुजबळ, रावसाहेब थोरात, राहूल आल्हाट, हेमंत पाटील आदी उपस्थित होते. माजी विद्यार्थी व गुरुजनांच्या हस्ते विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेंद्र ढमढेरे यांनी केले. अरुण भुजबळ यांनी सुञसंचालन केले. तर मच्छिंद्र नरके यांनी आभार मानले.