Thursday, July 25, 2024
Homeताज्या बातम्यासातारा जिल्ह्यातील रस्ते वाहतूक संदर्भात असलेल्या अनेक प्रश्नांवर पुणे येथे महामार्ग प्राधिकरणाच्या...

सातारा जिल्ह्यातील रस्ते वाहतूक संदर्भात असलेल्या अनेक प्रश्नांवर पुणे येथे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सूचना -छत्रपती उदयनराजे भोसले

प्रतिनिधी -मिलिंद लोहार सातारा

सातारा – दिनांक ९ फेब्रुवारी

कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात येण्यासाठी तसेच सातारा, पुणे जिल्ह्यातील प्रवाश्यांना महाबळेश्वर मार्गे कोकणात जाण्यासाठी, येण्यासाठी सुलभ व महत्त्वाचा असलेला पोलादपूर-सुरूर राज्यमहामार्गाच्या राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याच्या बाबतीत तसेच सातारा जिल्ह्यातील रस्ते वाहतूक संदर्भात असलेल्या अनेक प्रश्नांवर पुणे येथे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सूचना दिल्या.पोलादपूर-महाबळेश्वर-पांचगणी-वाई-सुरुर हा सध्याचा राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्गात रुपांतरीत करून जाहिर होणेबाबतचा प्रस्ताव द्यावा. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग झाल्यास, त्याचे जमिन हस्तांतरणाची रक्कम आणि अनुषंगीक बाबींची सोडवणुक करण्यासाठी आपण स्वतःपाठपुरावा करु.बैठकीमध्ये शेंद्रे ते कागल सहापदरीकरण, पुणे-सातारा, खंबाटकी बोगदा, कराड आणि सातारा शहरातील फ्लायओव्हरचे सुशोभिकरण इत्यादी बाबींचा आढावा घेतला.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणामार्फत सुरु असलेल्या विविध कामांची आढावा बैठक पुणे येथे पार पडली त्यावेळी ते बोलत होते.पुणे ते सातारा या रस्त्याचे काम सन २०१३ साली पूर्ण होणे आवश्यक होते. तथापि आज २०२२ सुरु होवून दोन महिने उलटत आले तरी सुध्दा अद्याप या रस्त्यावरील पुलांची, सेवा रस्त्यांची आणि विविध छोटी-मोठी कामे अपूर्ण आहेत. मंदगतीने काम होत असल्यास, त्याचा फटका अधिका-यांना नाही तर सामान्य लोकांना बसतो याचे भान प्राधिकारणाच्या संबंधीत अधिका-यांनी ठेवले पाहीजे.तीच अवस्था खंबाटकी घाटातील नविन बोगद्याची आहे. केंद्राकडून निधीची कोणतीही कमतरता नसतानाही आजमितीस फक्त २४ ते २५ टक्के काम झाले आहे. अश्या गतीने काम पूर्ण होण्याला किती वेळ लागेल याची जाणिव ठेकेदारांना आहे का ?सातारा आणि कराड शहराजवळुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ओव्हरब्रिज बांधले आहेत त्या खालील जागेचा सुयोग्य विकास होणे आवश्यक आहे. नाहीतर गलिच्छपणा आणि अतिक्रमणांची भर याठिकाणी पडणार आहे. त्यामुळे ओव्हरब्रिजच्या खालील जागांचे सुशोभिकरण करणेची कार्यवाही करावी. याठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकार्याने पोलिस चौकी, गार्डन, पार्किग, छोटेखानी भाजीमंडई, व्हर्टिकल गार्डनिंग आदी उपयुक्त योजना राबविणेबाबतही सूचना केल्या.पोलादपूर ते सुरुर हा राज्यमार्गावर प्रचंड वाहतुक असते. तसेच या मार्गावर अपघात देखिल वारंवार झालेले आहेत. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण करण्यात येणार आहे. तथापि हा राज्य मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाकडे वर्ग झाल्यास, रस्ता रुंदीकरणासंबंधातील जमिन हस्तांतरण प्रक्रीया, तसेच अनुषंगी बाबी याकरीता केंद्रशासनाकडून निधी उपलब्ध करुन घेतला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे आपण जरुर तो पाठपुरावा करु.असे यावेळी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगितले.

बैठकीत सूचवलेल्या सर्व बाबींवर कार्यवाही करण्याचे उपस्थित अधिकारी यांनी मान्य केले.बैठकीस शेंद्रे-कागल महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक कंधारकर, पुणे सातारा महामार्गाचे प्रकल्प संचालक कदम, आणि राष्ट्रीय महामार्ग संबंधीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रकल्प संचालक देशपांडे यांचेसह विविध प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!