कुलदीप मोहिते सातारा
दिनांक १० एप्रिल
सातारा – तीर्थक्षेत्र चाफळ तालुका-पाटण येथे रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला .तीर्थक्षेत्र चाफळ येथील श्रीराम मंदिरांमध्ये सत सीता रामचंद्र की जय…..प्रभू रामचंद्र की जय.., बोल बजरंग बली की जय.., च्या जयघोष. शेकडो धगधगत्या दिवट्यांच्या व सासन काठ्यांच्या साक्षीने हजारो भक्तांच्या उपस्थितीत गुलालाची उधळण करत श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.
रविवारी दुपारी बारा वाजता राम नवमी साजरी करण्यात आली. श्रीराम जन्म सोहळ्यावेळी भाविकांनी केलेल्या गुलालाचे उधळणीमुळे फुलांचा व गुलालाचा सडा पडला होता. संपूर्ण मंदिर परिसरातील वातावरण राममय झाले होते.प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या दर्शनासाठी भाविकांनी रविवारी सकाळपासूनच प्रचंड गर्दी केली होती. मंदिर परिसर भाविकांनी अक्षरश: गजबजून गेला होता. गुढीपाडव्यापासून या यात्रेस प्रत्यक्ष प्रारंभ होतो.
रविवारी पहाटे साडेचार वाजता काकड आरती, साडेपाच वाजता श्रीरामाची पूजा, रामनाम जप, सहा वाजता गीतापाठ, साडेआठ ते दहा वाजेपर्यंत भजन व आरती करण्यात आली. अकरा ते बारा वाजेपर्यंत श्रीराम मंदिराला तेरा प्रदक्षिणा घालत श्रीराम मारुती, शंकर, देवी कृष्णामाई, श्रीकृष्ण, गणपती अशा देवतांच्या आरत्या प्रदक्षिणाचे वेळी चालीवर म्हणण्यात आल्या. प्रभू रामास अभ्यंगस्नान घातल्यावर त्यांची विधीवत पूजा, पौरोहित्य विधी पुरोहितांनी केला. श्रीरामास न्हाऊ घातल्यानंतर रामाला पाळण्यात घालण्यात आले. श्रीराम जन्मसोहळयानंतर सर्व भाविकांना सुंठवड्याचे वाटप करण्यात आले.
कराडमध्येही नवमीचा उत्सवकराड शहर व परिसरातही रविवारी राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व पारंपारीक पद्धतीने भक्तिमय वातावरणात पार पडला. येथील शिवाजी हौसिंग सोसायटी, सोमवार पेठेतील गोंदवलेकर महाराजांचे राम मंदिर, कोटातील राम मंदिरांसह परिसरातील ग्रामीण भागातील विविध राम मंदिरांतही हा सोहळा पार पडला. अनेक ठिकाणी राम जन्मोत्सवानंतर महाप्रसादांचेही आयोजन करण्यात आले होते.