माजी खासदार आढळराव पाटील यांनी मंगळवारी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला.असून राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या आढळरावांनी पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला असून खासदार अमोल कोल्हे व आढळराव पाटील यांची लढत होण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून शिरूर मतदारसंघातून तिकीट दिले जाणार असल्याची चर्चा रंगत आहे.
दरम्यान विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी एक्स या सोशल मीडिया साईटवरून आढळराव पाटलांवर टीका केली आहे. ”शिवसेना वाचवायला निघालेले आज हळूच राष्ट्रवादीत घुसले”, असा टोला दानवे यांनी लगावला आहे.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी महाविकास आघाडीची स्थापना झाली तेव्हा राष्ट्रवादीसोबत गेल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर शिवसेना वाचविण्यासाठी शिंदे गटात जात असल्याचा कांगावा देखील त्यांनी केला होता. तिकीटासाठी शिंदे यांच्याकडून तिकीट मिळत नसल्याने व ही जागा राष्ट्रवादीला आल्याने आता अजित पवार गटात गेले आहेत. त्यावरून सध्या त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.