पाणी हक्क संघर्ष समिती शिरूरच्या माध्यमातून उभारणार लढा.
शिरुर तालुक्यातील पश्चिम भागातील दुष्काळी १२ गावांच्या धामारी (ता.शिरूर) येथील मंगळवारी झालेल्या दूस-या बैठकीत पाणी हक्क संघर्ष समिती शिरूर या व्यासपीठाच्या नावाखाली पाण्यासाठी लढा उभारण्याचा ठरावं करत बारा गावां मधुन विशेष सभेचे आयोजन करत शेती व पिण्याचे पाणी मिळावे या साठी संघर्ष समितीला पाठिंबा देण्याचे ठराव करण्याचा निर्णय झाला. लाखेवाडी मलठण हे गाव पाण्यासाठी आंदोलनात सहभागी होत असल्याचे सांगितले.
९ सप्टेंबर रोजी कान्हुर-मेसाई (ता.शिरूर) येथे पाबळ, केंदूर, धामारी, खैरेनगर, खैरेवाडी, हिवरे,कान्हूर, मिडगुलवाडी, चिंचोली-शास्ताबाद, मलठणची लाखेवाडी, सोने सांगवी व वरुडे आदी गावांच्या वतीने कायमस्वरुपीच्या शेती व पिण्याच्या पाण्यासाठीच्या उपलब्धतेसाठी तिव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय झाला. त्यानुसार पुढील बैठक आज (ता.१२) धामारी येथे संपन्न झाली. यात आंदोलनाची दिशा ठरविण्याबरोबरच आता गावोगावी जागृती होण्यासाठी प्रत्येक गावातून पाणी संघर्ष समितीसाठीचे लढणारे, आर्थिक बळ देणारे, वेळ देणारे आणि आंदोलन शेवटपर्यंत टिकविण्यासाठी सर्वस्वी बहाल करणारे कार्यकर्ते सदस्य नेमण्यासाठीची चर्चा झाली. त्यानुसार प्रत्येक गावात येत्या शुक्रवारी (ता.१५) विशेष ग्रामसभा घेण्याचे ठरले असून त्यानुसार तात्काळ कार्यवाही करण्याच्या सुचनाही यावेळी उपस्थितांनी दिल्या.
धामारी येथील राममंदिरात तब्बल तीन तास चाललेल्या या बैठकीत पक्षविरहीत आंदोलन करण्याचा निर्णय झाला असून प्रत्येक गावातून दोन किंवा चार प्रतिनिधी घेण्याचाही निर्णय झाला. विशेष म्हणजे ज्या गावांना डिंभे प्रकल्पातून पाणी मिळणे शक्य वा चासकमानमधून पाणी घेणे शक्य आहे त्या गावांनी तशा सुचना समितीकडे देण्याचेही सांगण्यात आले. कालव्यावरून पाणी आणण्यासाठी जो सर्वे करणे तीन त्या एजन्सीचा पूर्ण खर्च करण्याची तयारी हिवऱ्याचे व सरपंच दीपक खैरे व विकास गायकवाड यांनी दर्शवली.
आमच्यासाठी नाव व पक्ष महत्वाचा नाही – हे आंदोलन दुष्काळी गावांचे असून इथे कुणीही पदाधिकारी, कार्यकर्ता वा नेता नाही. त्यामुळे आमची कुणाचीही नावे, पदे वा पक्ष यांना प्रसिध्द करण्यापेक्षा या भागातील पाणी प्रश्न कायम स्वरूपी सुटावा हाच आमचा एकमेव अजेंडा राहिक असे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.