कोरेगाव भीमा – वाघोली ( ता.शिरूर) येथे भारतीय जैन संघटनेच्या विद्यालयात शिक्षक दिनी विद्यार्थीच शिक्षक, प्राचार्य ,उपप्राचार्य, ग्रंथपाल ,शिपाई सुद्धा झाले होते. या विद्यार्थी व विद्यार्थिनिंनी वर्गावर जात आपल्या मित्र मैत्रिणींचा वर्ग घेतला.त्यांना शिकवले त्यावेळी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारत एक वेगळाच आनंद घेतला.यावेळी आपल्या सोबतच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची वर्गावर शिकवण्यासाठी लगबग, शिकवण्याची पद्धती यामुळे धमालच झाल्याने शिक्षक दिनी बी.जे.एस विद्यालयात एक अनोखा शिक्षण सोहळा रंगला होता.
भारताचे दुसरे राष्ट्रपती थोर शिक्षणतज्ञ तत्वज्ञ डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. केवळ पुस्तकी ज्ञान न देता व्यावहारिक दृष्ट्या परिपूर्ण आणि सजग नागरिक बनवण्याचे ध्येय उराशी बाळगणारे शिक्षक सदैव आदर्श राहिले आहेत. म्हणून शिक्षक दिनाचे औचित्य साधून भारतीय जैन संघटना विद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
शिक्षक दिनी दहावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी शिक्षक बनून अध्यापनाचे कार्य करत सर्व विद्यालयाची धुरा सांभाळली. चि.अथर्व रासकर या विद्यार्थ्याने विद्यार्थी प्राचार्य म्हणून तर कु.श्रावणी जाधव या विद्यार्थिनीने विद्यार्थी पर्यवेक्षक म्हणून अतिशय उत्तम रित्या भूमिका पार पाडली. शिक्षकांपासून शिपाई ग्रंथपाल या सर्वच शालेय कर्मचाऱ्यांच्या भूमिकेत विद्यार्थी अगदी रममान झालेले दिसले.
५ सप्टेंबर ह्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून सर्व विद्यालयातील शिक्षकांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला. विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी पर्यवेक्षक पांडुरंग पवार शिक्षक अशोक पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थी मनोगतामध्ये श्रेया लोखंडे,सिद्धी सालके, महाडदेव,प्रेरणा नवले यांनी शिक्षकांविषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम संपन्न करण्यासाठी विद्यालयातील जयश्री दहिफळे व किर्ती ढमाले तसेच इतर सर्वच शिक्षकांनी विशेष परिश्रम केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु.कीर्ती मुंडे या विद्यार्थिनींनी केले. सर्व विद्यार्थी शिक्षकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला..