कोरेगाव भीमा – दिनांक २० मे
वढु बुद्रुक (ता. शिरुर) हद्दीत गावखरीचा मळा येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना आज रात्री साडेआठच्या सुमारास घडली असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज रात्री साडेआठच्या सुमारास वढु बुद्रुक (ता. शिरुर) हद्दीतील गावखरीचा मळा येथील नितीन अर्जुन शिवले यांचा चार वर्षाचा मुलगा वरद नितीन शिवले (वय 3) घरासमोर खेळत असताना अचानक बिबट्याने येवून त्यांच्यावर झडप घालत त्याला ओढत उसाच्या शेतात नेले. ही घटना पाहताच संतोष शिवले व इतर स्थानिकांनी उसाच्या शेतात धाव घेत बिबट्याच्या तोंडातून सोडून आणले व ताबडतोब उपचारासाठी पुण्यात रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. यापुर्वीही वढु बुद्रुक हद्दीत बिबट्यांने दोघांवर जीवघेणा हल्ला केला असून अनेक पाळीव प्राण्यांचा फडशा पाडल्याने बिबट्यांच्या दहशतीत असलेल्या वढु ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे.वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याचा तातडीने बंदाेबस्त करावा, अशी ग्रामस्थांची आग्रही मागणी आहे.