नागरिकांकडून वन विभागवार अभिनंदनाचा वर्षाव
कोरेगाव भीमा – वढु बुद्रुक ( ता.शिरूर) येथील तीन वर्षाच्या वरद शिवले या बालकावर गंभीर हल्ला करणाऱ्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनखात्याला यश मिळाले असून अवघ्या पाच दिवसात ही कामगिरी केल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. बुधवारी दि.२५ मे पहाटे सचिन रामचंद्र देशमुख यांच्या डोबितल्या शेतात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
दिनांक २० मे ला रात्री साडे आठ वाजता वढु बुद्रुक (ता. शिरुर) हद्दीतील गावखरीचा मळा येथील नितीन अर्जुन शिवले यांचा चार वर्षाचा मुलगा वरद नितीन शिवले (वय 3) घरासमोर खेळत असताना अचानक बिबट्याने येवून त्यांच्यावर झडप घालत त्याला ओढत उसाच्या शेतात नेले. ही घटना पाहताच संतोष शिवले व इतर स्थानिकांनी उसाच्या शेतात धाव घेत बिबट्याच्या तोंडातून सोडून आणले व ताबडतोब उपचारासाठी पुण्यात रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
यापुर्वीही वढु बुद्रुक हद्दीत बिबट्यांने दोघांवर जीवघेणा हल्ला केला असून अनेक पाळीव प्राण्यांचा फडशा पाडल्याने बिबट्यांच्या दहशतीत असलेल्या वढु ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली होती.वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याचा तातडीने बंदाेबस्त करावा, अशी ग्रामस्थांची आग्रही मागणी केली होती बिबट्याचे हल्ले सुरूच असल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.यानंतर, हल्लेखोर बिबट्याला पकडण्यासाठी मोहीम सुरू होती. त्याला जेरबंद करण्याकरिता काही ठिकाणी पिंजरे लावण्यात आले. याशिवाय वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. अखेर आज या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले असून बिबट्याला पिंजऱ्यात पकडल्यानंतर त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. जेरबंद केलेला बिबट्या वन शिपाई आनंद हरगुडे,हिरामण ढेकणे यांच्या निगरानिखाली जुन्नर कडे रवाना करण्यात आला असल्याची प्राथमिक मिळाली आहे. यावेळी बिबट्या जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या वन परिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, वन परिमंडळ अधिकारी पी ए क्षीरसागर ,वनरक्षक बी एम दहातोंडे,वनरक्षक. प्रमोद पाटील, वन सेवक एन बी दांदले, वन शिपाई आनंद हरगुडे,हिरामण ढेकणे यांचे वढू बुद्रुकच्या सरपंच सारिका अंकुश शिवले यांच्यासह नागरिकांनी आभार मानले.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याच्या पावलांची ठसे व त्याचा वावर याचा अचूक अंदाज घेत त्या ठिकाणी पिंजरे लावले होते त्यात बिबट्या अवघ्या पाच दिवसात अडकला असून वनविभागाच्या कार्यतत्परतेमुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला असून वनविभागाच्या कामगिरीबद्दल नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.