कोरेगाव भीमा – दिनांक ३० एप्रिल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेसाठी रवाना होताना आज सकाळी श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करुन दर्शन घेतले. वढु बुद्रुकला प्रथमच येत असलेल्या राज ठाकरे यांना पाहण्यासाठी सकाळपासूनच अनेकांनी येथे गर्दी केली होती. त्यामुळे पोलिसांनीही कडक बंदोबस्त ठेवला होता.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या (ता. १) रोजी औरंगाबाद येथे सभा होत आहे. सभेसाठी आज पुण्याहून औरंगाबादकडे जाताना सकाळी ११ च्या सुमारास ते वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी दर्शनासाठी आले. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ. सारीका अंकुश शिवले, उपसरपंच हिरालाल तांबे यांच्यासह ग्रामपंचायत तसेच मनसे पदाधिकारी व ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले. यानिमित्त शंभुराजांचे समाधिस्थळ आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते. समाधिस्थळी पुजाअभिषेक व ध्येयमंत्र झाल्यानंतर राज ठाकरे यांनी समाधिस्थळी प्रदक्षिणा घालून शंभुराजांच्या पुतळ्यासही पुष्पहार घातला. यावेळी पौरोहित्य करणारे वढु बुद्रुक येथील अविनाश मरकळे यांच्याशी संवाद साधत राज ठाकरे यांनी येथील नित्यपुजा तसेच पुण्यतिथीच्या कार्यक्रमाची थोडक्यात माहितीही घेतली. यावेळी पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला राज्यभरातून मोठ्या संख्येने शंभुभक्त येत असल्याची माहिती घेतल्यानंतर येथील कार्यक्रमाला यायला नक्की आवडेल, असा सकारात्मक प्रतिसादही राज यांनी दिला. त्यानंतर त्यांच्या वाहनांचा ताफा औरंगाबादच्या दिशेने रवाना झाला.
या प्रसंगी राज ठाकरे यांच्यासमवेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्याचे नेते अनिल शिदोरे, बाबु वागस्कर, राज्य सरचिटणीस किशोर शिंदे, राज्य उपाध्यक्ष बाळा शेडगे, गणेश सातपुते, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, उपाध्यक्ष हेमंत बत्ते, शहराध्यक्षा वनिता वागस्कर, जिल्हाध्यक्ष समीर ठिगळे, उपजिल्हाध्यक्ष रामदास दरेकर, मेहबूब सय्यद ,समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे, वढू गावच्या सरपंच सारिका शिवले,उपसरपंच लालाशेठ तांबे ,ग्राम पंचायत सदस्य माऊली भंडारे, राहूल कुंभार, अनिल भंडारे, कृष्णा अरगडे, बापूसाहेब आहेर,सोणेश शिवले, माजी उपसरपंच. रमाकांत शिवले, ,माजी सरपंच अंकुश शिवले,भाजपाचे भगवान शेळके, कैलास सोनवणे , रोहित खैरे,स्मृती समितीचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे, संभाजी भंडारे, अशोक भंडारे, शांताराम भंडारे ,लक्ष्मण भंडारे, मनसेचे अनिल शिवले,सचिन भंडारे,अरविंद भंडारे,पोलीस पाटील जयसिंग भंडारे,स्वप्नील शेळके आदींसह अनेक पदाधिकारी तसेच मनसैनिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दरम्यान राज यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभुमीवर कायदा सुव्यवस्थेसाठी पोलिसांनीही वढु परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला होता.