कोरेगाव भीमा – दिनांक ,३ डिसेंबर
‘जागतिक दिव्यांग दिना’चे औचित्य साधून केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्यावतीने वर्ष २०२१- २२ चा राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार वितरण सोहळा नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित करण्यात आला होता.
दिव्यांगांनी, राज्य शासनाने तसेच गैरशासकीय संस्थांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी वर्ष २०२१- २२ चे राष्ट्रीय दिव्यांग सक्षमीकरणासाठीचे राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शनिवारी वितरण झाले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्य मंत्री रामदास आठवले, प्रतिमा भौमिक, केंद्रीय दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव राजेश अग्रवाल मंचावर उपस्थित होते.
दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. दिव्यांगांसाठीच्या ‘सुगम्य भारत” अभियानाची यशस्वीपणे अंमलबजावणी केल्याबद्दल महाराष्ट्रातील ४ व्यक्ती, १ संस्था आणि अकोला जिल्हा परिषदेला सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की दिव्यांग व्यक्तींच्या आंतरराष्ट्रीय दिनाचे उद्दिष्ट अपंगांशी संबंधित समस्यांबद्दल जागरूकता वाढवणे हा आहे.
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील आरोग्य सेवेबद्दल विमल गव्हाणे यांचा सन्मान –
पुण्याच्या विमल पोपट गव्हाणे यांना श्रेष्ठ दिव्यांग व्यक्ती या श्रेणीतील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या पुणे जिल्हयातील हवेली तालुक्यामधील पेरणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला आरोग्य कर्मचारी या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी कोरोनासाथीदरम्यान रुग्णांचे लसीकरणाच्या कामात वरिष्ठ वैद्यकीय अधिका-यांसोबत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कुटुंब नियोजन, पल्स पोलिओ लसीकरण, १६ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील बालकांचे लसीकरण यासह आरोग्य केंद्रांतर्गत राष्ट्रीय कार्यक्रम राबविण्याच्या उपक्रमांमध्ये गव्हाणे यांचा सहभाग असतो.
डिंग्रजवाडी येथील मूळ रहिवासी असलेल्या विमल गव्हाणे यांच्या सत्काराने शिरूर – हवेली तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून पुणे जिल्ह्यातून राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात येणार त्या एकमेव महिला आरोग्य सेविका आहे.
गोरगरीब जनतेची विनम्र,निस्वार्थ सेवाभावी वृत्तीने गेली ३७ वर्ष न थकता अखंड २४ तास प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत सेवा केल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांच्या आशीर्वादाने व जनतेच्या प्रेरणेने पुरस्कार मिळाला.हा पुरस्कार देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिक,शेतकरी ,कष्टकरी व गोरगरीब जनतेला अर्पण करीत आहे.
विमल गव्हाणे (दौंडकर) , सहाय्यक आरोग्यसेविका