कोरेगाव भीमा – ता.२१ मार्च
श्री क्षेत्र वढू बुद्रुक ( ता.शिरूर) येथे स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३४ व्या बलिदान दिनी राज्यभरातून मोठ्या संख्येने शंभू भक्त उपस्थित होते. राज्यभरातून ठीकठीकानाहून धर्मवीर ज्योत आणल्या जात होत्या. यावेळी मुखामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष करत कपाळावर भगवा टिळा, भगवा फेटा, हातात धगधगणारी धर्मवीर मशाल व सळसळणारा भगवा ध्वज हातात घेतलेले शंभुभक्त मोठ्या संख्येने नतमस्तक होत स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत होते.त्यांच्या बलिदानाने पावन झालेल्या भूमीवर माथा टेकवत नतमस्तक होत होते.छञपती संभाजी महाराज की ….. जय असा जयजयकार करण्यात येत होता.
सकाळी सहा वाजता छञपती संभाजी महाराज यांचा त्याग, बलिदान व शौर्याला स्मरण करून छञपती संभाजी महाराजांची अंत्ययात्रा निघाली नाही म्हणून मुक पदयात्रा सकाळी सहा वाजता करण्यात आली यावेळी पंचक्रोशीतील व महाराष्ट्रातील अनेक शंभू भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी किल्ले पुरंदर ते वढू बुद्रुक पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले .आयोजक भाजपा हवेली तालुकाध्यक्ष संदीप भोंडवे व शंभू भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अचानक पाऊस आल्याने हेलिकॉप्टर ने पुष्प वृष्टी उशिराने करणेत आली. मान्यवरांच्या उपस्थित शंभू भक्तांनी पुष्पवृष्टी करत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केले तर पोलीस प्रशासनाच्या वतीने तीनवेळा फायरींग करत सशस्त्र सलामी देण्यात आली.यावेळी पारंपरिक शस्त्रांची सलामी देत अभिवादन करण्यात आले.
ग्राम पंचायत वढू बुद्रुक यांच्यावतीने शंभू भक्तांचे स्वागत करण्यात आले. ग्रामपंचायत वढू बुद्रुक यांच्यावतीने शंभू भक्तांसाठी स्वच्छता ,पिण्याचे पाणी , भोजन व थंडगार ताक ( मठ्ठा) यांची व्यवस्था तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समिती यांच्यावतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कोरेगाव भीमा येथे व वढू बुद्रुक येथे ग्राम पंचायतीच्या वतीने कमानी उभारण्यात आल्या होत्या. छञपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनी रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने शंभू भक्तांनी रक्तदान केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाने विशेषतः शिक्रापूर पोलीस स्टेशन यांनी कडक व चोख बंदोबस्त ठेवला होता.वाहनांची पार्किंग , ठीकठीकानी पोलीस कर्मचारी ,अधिकारी आपले कर्तव्य बजावत होते .बलिदान पार पाडण्यासाठी व शंभू भक्तांच्या सेवेसाठी ग्राम पंचायत कर्मचारी व ग्रामस्थांनी मोठे कष्ट घेतले.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी, पोलीस शिपाई अशोक केदार, कारंडे, राज्य राखीव पोलीस दलाचे कर्मचारी व शिक्रापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी अभिवादन यशस्वी पार पाडण्यासाठी कर्तव्य बजावले.
स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास केलेली आकर्षक पुष्प सजावट आकर्षक फुलांची करण्यात आल्याने शंभू भक्तांनी कुटुंबासह अभिवादन करत मोठ्या प्रमाणात सेल्फी घेतले यावेळी समाज माध्यमा वरील रिल्स बनवणारे यांनी व्हिडिओ बनवले.