Saturday, July 27, 2024
Homeस्थानिक वार्तायावर्षी शिवप्रताप दिन मोठया उत्साहात साजरा करण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा पुढाकार

यावर्षी शिवप्रताप दिन मोठया उत्साहात साजरा करण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा पुढाकार

हेमंत पाटील कराड

सातारा – यावर्षी ३० नोव्हेंबरला किल्ले प्रतापगड येथे शिवप्रताप दिन साजरा केला जाणार आहे. यंदाच्या वर्षी हा दिन मोठया उत्साहात साजरा व्हावा यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे.

शिवप्रताप दिन मोठया उत्साहात साजरा करण्यासाठी त्याचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री देसाई यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच या निमित्ताने प्रतापगड येथे आयोजित करावयाच्या कार्यक्रमाविषयी आढावा बैठकही बोलावण्यात आली आहे.

शिवप्रताप दिनासाठीच्या तयारीचा आढावा घेऊन पालकमंत्री देसाई म्हणाले, ध्वजस्तंभास शोभेल असा भव्य जरीकाठी भगवा झेंडा ठेवावा. संपूर्ण गडाला दोन दिवस विद्यूत रोषणाई करावी, लेझर शो, मशाल महोत्सव व आतषबाजीचे आयोजन करावे. कार्यक्रमाच्या ठिकाणी विद्यूत जनित्र ठेवावे. तालुकास्तरीय आधिकाऱ्यांनी गावा-गावात जाऊन ग्रामस्थांना कार्यक्रमाचे निमंत्रण द्यावे, जास्तीत जास्त नागरिक या उत्सवात सहभागी होतील यासाठी प्रयत्न करावेत, कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांची कामे त्वरीत करावीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या उत्सवात मर्दानी खेळ, लेझीम तसेच ढोलपथके, पोवाडा या पारंपारीक कार्यक्रमांसोबतच शासनातर्फे पोलीस मानवंदना देण्यात येणार आहे. सुरक्षिततेच्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे. सर्व विभागप्रमुखांनी समन्वयांनी काम करावे, अशा सूचना पालकमंत्री देसाई यांनी दिल्या.

सुरवातीस सकाळी भवानी मातेची पूजा अभिषेक व आरती त्यानंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम.  शिवप्रतिमा पालखी पूजा, मिरवणूक, शिवपूतळ्यास जलाभिषेक, पूजा आणि हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.   यानंतर पोवाडा, मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, मर्दानी खेळ यांचे सादरीकरण असे कार्यक्रमाचे सर्वसाधारण स्वरुप असणार आहे.

शिवप्रतापदिन उत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री देसाई यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठक घेतली. या बैठकीस जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील आदींसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!