Wednesday, July 24, 2024
Homeताज्या बातम्यामहिलांनी आपल्यातील अतुलनीय धैर्य व शक्ती ओळखत कुटुंब व समाजाच्या विकासासह आवडीच्या...

महिलांनी आपल्यातील अतुलनीय धैर्य व शक्ती ओळखत कुटुंब व समाजाच्या विकासासह आवडीच्या क्षेत्रात नावलौकिक मिळवावा – कुसुम मांढरे

माहेर संस्थेत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

कोरेगाव भिमा – वढू बुद्रुक (ता.शिरूर) महिलांनी एकसंघ होण्याची गरज असून महिला शक्ति ही सर्वात मोठी एकसंघ शक्ती आहे. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. महिलांमध्ये मध्ये असलेली अतुलनीय धैर्य व शक्ती ओळखून महिलांनी एकत्रित येत कुटुंबाचा व समाजाचा विकास करत आपल्या आवडीच्या क्षेत्रात नावलौकिक मिळवायला हवातसेच सर्व महिलांमध्ये एक वेगळी प्रेरणा निर्माण व्हावी अशी अपेक्षा जिल्हा परिषद सदस्य कुसुम मांढरे यांनी माहेर संस्थेच्या जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केली.

स्वराज्य राष्ट्र
वढू बुद्रुक (ता.शिरूर) येथे जागतिक महिला दीन साजरा करताना मान्यवर

माहेर संस्थेच्या संस्थापिका, संचालिका सिस्टर लूसी कुरियन यांच्या संकल्पनेतून हा महिला मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला माहेर संस्थेतील बालकांनी प्रार्थना नृत्य केले. समाजामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला. त्यामध्ये सिव्हिल इंजिनियर म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी मिळवलेल्या श्रद्धा शेंगदाणे, इंग्लिश मीडियम स्कूल चालवणाऱ्या विद्या कनमोसे, ब्युटी पार्लर, टेलरिंग यांचे ट्रेनिंग घेऊन इतरांना शिकवणाऱ्या मंगला गरजे, पोलीस खात्यात नोकरीला लागलेली माहेर संस्थेची मुलगी वृषाली भागवत, संस्थेमध्ये सर्व मुला-मुलींना कथक शिकवणाऱ्या सुषमा जाधव, माहेर संस्थेत सुरक्षिततेची भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडणाऱ्या हर्षा शितोळे इत्यादी कर्तुत्वान महिलांचा यावेळी शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे शिव, फुले, शाहू, आंबेडकर विचारांचे व्याख्याते जगदीश ओहोळ यांनी आपल्या मनोगतामध्ये महिला दिन साजरा करताना महिलांनी सावित्रीबाई फुले यांचे स्मरण करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. तसेच प्रत्येक महिलांचा आदर करणे म्हणजे महिला दिन साजरा करणे. स्त्री म्हणजे सहनशक्तीची परिसीमा असल्याचे मत व्यक्त केले. प्रत्येक स्त्रीला संविधानामुळे मुक्ती मिळाली त्या संविधानाची आठवण ठेवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

माहेर संस्थेतील महिलांनी नृत्य आविष्कार करून उपस्थित महिलांची मने जिंकली.श्रद्धा सोनके या विद्यार्थिनीने आई या विषयावरती एकपात्री नाटिका सादर केली या नाटकेने सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सभापती मोनिका हरगुडे, ॲडव्होकेट अर्चना कोकरे, शिवव्याख्यात्या सुचिता भिसे, वढू बुद्रुक गावचे सरपंच अंजली शिवले, प्रसिद्ध व्याख्याते जगदीश ओहोळ, ॲडवोकेट अर्चना कोकरे, शिवव्याख्याते सुचिता भिसे, ओबीसी माळी महासंघाच्या अध्यक्षा शितल कापरे, आपटी गावच्या माजी सरपंच सुनीता शिवले, हवेली पंचायत समितीच्या माजी सभापती संजीवनी कापरे, माहेर संस्थेच्या अध्यक्षा हीरा बेगम मुल्ला, व्यवस्थापक शरली अँथोनी, इतर सामाजिक कार्यकर्ते, पंचक्रोशीतील महिला बचत गटाचे महिला सदस्या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाची प्रस्तावना मीरा गायकवाड, सूत्रसंचालन रमेश दुतोंडे तर आभार प्रदर्शन शार्ली अँथोनी यांनी मानले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!