थेरगाव येथे मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
पुणे – १९९० सालापासुन मराठा सेवा संघ ही पुरोगामी विचारधारेची ढाल आणि विकृतीवर आक्रमकपणे वार करणारी तलवार अशी ओळख धारण करणारी संस्था आहे. मराठा सेवा संघाने महाराष्ट्राला सांस्कृतिक दिशा दिली, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाच्या उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी केले.
मराठा सेवा संघाचा ३२ वा वर्धापन दिन थेरगाव येथील राजमाता जिजाऊ सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मराठा सेवा संघाच्या उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव मराठा सेवा संघाच्या कार्याचा आढावा देताना बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ वंदना घेऊन करण्यात आली. या वेळी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला मराठा सेवा संघाचे अशोक सातपुते, गजानन आढाव, मंगेश चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्रकाश जाधव म्हणाले की, मराठा सेवा संघाने धार्मिक, जातीय विद्वेषातुन दगडे उचलणाऱ्या युवकांच्या हातात वैचारिक पुस्तके दिली. महाराष्ट्रातील जातीय सलोखा वाढविला. इतिहासाच्या पुनर्लेखनाची चळवळ उभा करुन इतिहासाचे विकृतीकरण रोखले. महापुरुषांचे विचार घराघरापर्यंत घेऊन जाणाऱ्या लेखक, वक्ते, शाहीर, कलाकारांची मोठी फळी निर्माण केली. लेखकांना वाचकवर्ग दिला. वक्त्यांना श्रोतावर्ग दिला. कलाकारांना प्रेक्षकवर्ग दिला. महाराष्ट्राला वैचारिकवर्ग दिला. धार्मिक गोष्टींचा विचार करताना धर्माचा उदात्त विचार सांगणारी “शिवधर्म गाथा” दिली. समाजातील सांस्कृतिक दहशतवाद संपविण्यासाठी समाजाला सांस्कृतिक वारसा आणि बुद्ध-तुकोबा-शिव-फुले-शाहू-आंबेडकर ही साखळी समजावुन सांगितली, असे प्रकाश जाधव म्हणाले.
संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे म्हणाले की, मराठा सेवा संघाचे कार्य प्रत्यक्षात जितके दिसून येते, तितकेच अप्रत्यक्ष महाराष्ट्रातील सर्व समाजघटकांवर मराठा सेवा संघाच्या चळवळीचा प्रभाव पडला आहे. आज माझ्यासारखे अनेक जण वेगवगेळ्या विषयांवर निर्भीडपणे व्यक्त होतात. त्यासाठी मराठा सेवा संघाचा खूप मोठा वैचारिक आधार राहिलेला आहे. पुरोगामी विचारांची नाळ बळकट करून विचारांनी एक असलेल्या साथीदारांना एकत्र आणण्याचे काम मराठा सेवा संघ करत आहे. त्यामुळे वैचारिक क्रांती होणार हे मात्र नक्की.
संभाजी ब्रिगेड चिंचवड विधानसभा अध्यक्ष संग्राम चव्हाण, बसपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुरेश गायकवाड, पिंपरी चिंचवड महासचिव राजेंद्र पवार, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पवार यांनी मराठा सेवा संघाच्या सामाजिक कार्याविषयी मनोगते व्यक्त केली. या वेळी संभाजी ब्रिगेडचे शहर कार्याध्यक्ष ज्ञानदेव लोभे, सचिव सुभाष जाधव, संघटक महेश कांबळे, उपाध्यक्ष नितीन जाधव, प्रवक्ते बाळासाहेब मुळे, राहुल मदने, राजन नायर, दत्ताभाऊ होनाळे, कैलास जाधव, संतोष सुर्यवंशी, शाम पाटील, गणेश बावणे, पराग जाधव, सिध्दार्थ भोसले, दत्ता लबडे, रामेश्वर बिरादार, योगेश साळवी, बळीराम खंडागळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सुत्रसंचालन संजय जाधव यांनी तर आभार रविंद्र चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवडचे शहर अध्यक्ष सतिश काळे यांनी केले होते.