बाजरीची भाकरी, बेसन, शेंगामिरची, पाणी बाटल्यांचे बॉक्स, बिस्किटे, चहा, फरसाण, मसाला ताक तसेच इतर अन्नपदार्थांची पॅकेट सुविधा देत बांधवांची सेवा
कोरेगाव भीमा, ता. २३ : मनोज जरांगे पाटील यांचे पुणे – नगर रस्त्यावर कोरेगाव भीमा, वढु बुद्रुक तसेच पेरणे, तुळापूर फाटा, लोणीकंद येथे स्थानिकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. सर्व समाजबांधवांचे स्वागत तसेच त्यांना पाणी बाटल्या व अन्नपदार्थाची पाकीटे देण्यासाठी शिरुर-हवेलीत स्थानिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद दिसून आला.
शिवछत्रपतींच्या पोवाड्यांसह छत्रपती शिवाजी महाराज की जय…..हर हर महादेव…एक मराठा…लाख मराठा..जय श्रीराम अशा गगनभेदी घोषणा देत भगवे झेंडे, भगव्या टोप्यां घातलेल्या असंख्य समाजबांधवांमुळे पुणे – नगर रस्ता अक्षरश: गर्दीने फुलून गेला होता. दुपारपासून या समाजबांधवांची वाहने येण्यास सुरुवात झाली.
या समाजबांधवांना स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने बाजरीची भाकरी, बेसन, शेंगामिरची, पाणी बाटल्यांचे बॉक्स, बिस्किटे, चहा, फरसाण, मसाला ताक , केळी तसेच इतर अन्नपदार्थांची पॅकेटसही देण्यात आली.
मात्र गावाेगावी प्रतिक्षेत थांबलेल्या स्थानिकांच्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे जरांगे पाटील यांच्या पदयात्रेस मात्र नियोजित वेळेपेक्षा उशिर हाेवूनही त्यांच्या प्रतिक्षेत नगर रस्त्यांवर ग्रामस्थ थांबून होते. दरम्यान जरांगे पाटील यांच्यासमवेत आलेली वाहने मात्र लवकरच मुक्कामाच्या ठिकाणी पुढे नेण्यात आली.
जरांगे पाटील यांच्यासह समाजबांधवांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर लावण्यात आले होते, तर जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी हार, फुलांची उधळण तसेच औक्षण करण्यांसाठीही महिला भगिनी उशिरापर्यंत थांबूनहोत्या.
पुणे-नगर महामार्गावर सर्व समाज बांधवांना जेवण, पिण्याचे पाणी, अन्नपदार्थाची पाकीटे देण्यासाठी आयोजक तसेच स्थानिकांनी गावागावात अतिशय उत्कृष्ट नियोजन केले होते. यासाठी युवा कार्यकर्ते, महिला भगिनींसह लहानमुलांचाही स्वयंत्स्फुर्त सहभाग दिसून आला. या सर्व सुविधांमुळे प्रवासात कोणाचीही गैरसोय झाली नाही. दरम्यान काेरेगाव भीमा, पेरणेफाटा, लोणीकंद पट्टयातून पुण्याकडे मार्गस्थ होताना या समाजबांंधवांची कोणतीही गैरसोय होवू याबाबत स्थानिक समाजबांधवांसह पोलीस खात्यानेही आवश्यक ती काळजी घेत या पट्ट्यात वाहतुक पर्यायी मार्गाने वळवून उत्तम नियोजन केले.