यवतमाळमधील धक्कादायक प्रकाराने शिक्षकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत २३ जानेवारीपासून युद्धपातळीवर सर्वेक्षण करण्यात येत आहे.त्यासाठी राज्यातील सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. अशातच आपले कर्तव्य बाजवत असलेल्या दोन शिक्षकांना या सर्वेक्षणादरम्यान मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळ मधील जिजाऊ नगर येथे घडल्याने शिक्षकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आहे.
यवतमाळ शहरातीलजिजाऊनगर भागात संदीप पत्रे आणि अमोल बाबरे या शिक्षकांना एका व्यक्तीने सर्वेक्षणादरम्यान शिवगाळ करत मारहाण केली आहे. या प्रकरणी शिक्षकांनी मारेकऱ्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सदर घटनेचा पोलीस तपास करत आहेत.
यवतमाळ शहरातील जिजाऊनगर भागात २९ जानेवारीला दुपारी संदीप पत्रे आणि अमोल बाबरे हे शिक्षक मराठा आरक्षणाचा सर्वेक्षण करत होते. दरम्यान ते या परिसरात सर्व्हे करताना आशीष सावळकर नामक तरुणाने संदीप पत्रे यांना अचानक शिवीगाळ सुरू केली. त्यावर शिक्षकाने त्याकडे फार लक्ष न देता आणि माहिती न घेताच त्यांच्या घरून काढता पाय घेतला. मात्र सावळकर नामक तरुणाने अचानक मागून येत संदीप पत्रे यांच्यावर हल्ला करत शिवीगाळ सुरू केला. त्यामुळे जवळच असलेले शिक्षक अमोल बाबरे हे त्यांच्या मदतीस धावले आणि या तरुणाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने अमोल यांना देखील मारहाण सुरू केली.