कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा ( ता.शिरूर)
ऐतिहासिक,पौराणिक व धार्मिक महत्व आणि श्रेष्ठत्व असणाऱ्या भीमा नदीच्या पात्रात थेट मिसळणारे मैलामिश्रित पाणी, नदीपात्रात थेट मिसळणारे सांडपाणी, जलपर्णी,निर्माल्य व जुने कपडे,गोधड्या व इतर टाकाऊ वस्तू यांमुळे भीमा नदी प्रदूषित झाली आहे. भीमा नदीकाठी असणाऱ्या पाणीपुरवठा योजनांमधून होणारा पाणी पुरवठा पाहता गावांचे ,शेतीचे आरोग्यही दूषित पाण्यामुळे धोक्यात आले आहे.
बऱ्याच नागरिकांना त्वचारोग जडले आहेत, त्याचबरोबर डोक्यात कोंडा, केस गळणे, अंगावर चट्टे येणे,पोटाचे आजार असे आजार मोठ्या प्रमाणात वाढत असून याचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी नदीच्या पाण्याची शुद्धता प्रशासन तपासण्यास प्राधान्य देईल काय ?? नागरिकांच्या मनात यामुळे पाण्याबाबत शंका निर्माण होत असून भीमा नदीचे पाणी पिण्या व वापरण्यायोग्य आहे याबाबत शंका निर्माण होऊ लागल्या आहेत तसेच याबाबत ग्राम पंचायत व संबधित विभाग योग्य ती कार्यवाही करण्यासाठी पुढाकार घेणार की हातावर हात ठेऊन पाहत राहणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. यामागचे नेमके कारण शोधण्यासाठी शासन प्रयत्न करणार का ? या पाणवनस्पतीमुळे नदीकाठच्या परिसरातील पाणी प्रदूषणाची समस्या आणखी वेगाने वाढून डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा उग्ररूप धारण करत चालला आहे. प्रशासन नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात आता काय भूमिका घेणार? की त्यांना वाऱ्यावर सोडून देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
जलपर्णी एकाच जागेवर थांबून राहिल्यास तेथील पाण्याचा रंग काळाकुट्ट बनतो आणि पाणी अतिशय घाण झाल्याने मासे मरण्याच्या प्रमाणात वाढ होते. तसेच या काळ्या पाण्यामुळे पाण्यात उतरणारे मच्छीमार व शेतकऱ्यांच्या अंगाला खाज सुटणे, गांधी येणे असे प्रकार होत आहेत. पाण्याला विशिष्ट प्रकारची दुर्गंधी येते. या ना त्या कारणामुळे जलाशयाचे पाणी वरचेवर दूषित होत असताना व ते पिण्यायोग्यही राहिले नसताना यावर काहीही उपाययोजना केली जात नाही. हेच दूषित पाणी मात्र सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेद्वारे नागरिक पिण्यासाठी वापरतात, त्यामुळे रोगराई मात्र वाढते की काय असा प्रश्न निर्माण होत आहे जलपर्णी, तत्सम वनस्पतींनी व्यापलेले नदीपात्र, नदीकाठावर उभे राहिल्यास अनुभवावयास येणारी दुर्गंधी आणि वाहणारे काळेकुट्ट पाणी! हे पाणी वाहते की गटारातील काळेकुट्ट पाणी हा प्रश्न निर्माण होतो ,जवळ गेल्यावर नाकाला झोंबणारा दुर्गंध युक्त वास भीमा नदीचे हे विदारक रूप सध्याचे वास्तव आहे. नदीत मिसळणारे मैला मिश्रित पाणी, उद्योगांचे रसायन युक्त पाणी या पाण्यामुळे नद्यांमधील जलचर प्राण्यांच्या अस्तित्वापुढे धोका निर्माण झाला आहे. भीमा नदीचे पात्र जलपर्णीच्या मगरमिठीत अडकले असून , नदीच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.यामुळे शेतीच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता आहे याबाबत आता तरी प्रशासन आता तरी जागरूक होऊन काम करेल काय ?वास्तविक नदी प्रदूषण रोखण्यासाठी स्वयंशिस्तीची गरज आहे. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था आणि राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे त्यातून सांडपाणी प्रक्रिया होणे आवश्यक आहे. जल प्रदूषण रोखण्यासाठी प्रसंगी प्रदूषणासाठी कारणीभूत असणाऱ्या घटकांवर कठोर कायदेशीर कारवाईची आवश्यकता आहे.अनेक गावांच्या पाणी योजना नदीवरून आहेत. मुळात नद्यांचे दूषित पाणी आणि जलशुद्धीकरण प्रकल्पांचा अभाव यांमुळे दूषित पाण्याचाच पुरवठा होत आहे.नागरिकांमधील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बेपर्वाई यांमुळे नदी प्रदूषण अधिक गतीने होत आहे.नद्यांमध्ये थेट टाकण्यात येणारा कचरा आणि थेट सोडण्यात येणारे सांडपाणी, मैलामिश्रित पाणी यांमुळे नदिची वाईट अवस्था झाली आहे.
हजारो हेक्टर जमिनीला पाणी पुरवठा होत असलेल्या या नदिबाबत इतक्या मोठ्या प्रमाणात उदासीनता का ? भीमा नदीच्या पात्रावर जल पर्णी दिसत असून भीमा नदीच्या पाण्यावर सहज नजर टाकली आपल्याला बालकवींची एक कविता आठवते हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे ,…..
हे हिरवे हिरवे गार गालिचे नदीच्या आरोग्याला बाधा आणणारे ,नदी प्रदूषित होत असणारी धोक्याची घंटा आता तरी शासनाच्या कानावर पडेल काय ? तिचा आक्रोश आता तरी कोणी ऐकेल काय .? तिच्या आरोग्याला बाधक ठरणाऱ्या मैलामिश्रीत पाणी, रसायनयुक्त पाणी,जोडलेल्या सांडपाण्याच्या लाईन , गोधड्या, खराब जुनी कपडे, निर्माल्य यांच्या पासून तिची सुटका होईल का ? आ तरी नदीला मोकळा श्वास घेता येण्यासाठी प्रश्न आणि नागरिक प्रयत्न करतील काय ? भीमा नदीची वेदना आता तरी समजून घेतली जाईल काय ??