Saturday, July 27, 2024
Homeसाहित्य/सामाजिकचला व्यक्त होऊ या?भाकरीचा चंद्र शोधणारा एक उपेक्षित, वंचित श्रावण बाळ....

भाकरीचा चंद्र शोधणारा एक उपेक्षित, वंचित श्रावण बाळ….

ये आझादी झुठी है,देश की जनता भुकी है…

सोबतचे छायाचित्र शिक्रापूर ( ता.शिरूर) येथे रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या एका छोट्या मुलाच आहे तो भटक्या वंचित समाजातील आहे.स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना यांचं काय ? तिरंगा झेंडा घेण्यासाठी धावाधाव करणाऱ्या चिमुकल्यांपेक्षा आईची जीर्ण झालेली साडी ,खपाटीला गेलेले पोट आणि डोळ्यात भरून राहिलेली उदासीनता,अपंग वडिलांच्या गाड्याला अंगातील सर्व शक्तीनिशी ढकलत आहे ते लहान लेकरू ना त्याला शिक्षण , ना अत्यावश्यक गरजा पूर्ण करू शकणारे सुरक्षित वातावरण तो मात्र अपंग वडिलांचा गाडा ढकलतो आहे पोटाच्या ,भुकेच्या दिशेने जिकडे पोटभरेल ती त्यांची दिशा आणि सुशिक्षित , प्रगतशील समाजातील त्यांची ही अशी दयनीय दशा ….

अपंग असलेल्या वडिलांचा पाय होऊ पाहणाऱ्या ,क्षीण झालेल्या आईला आधार देऊ पाहणाऱ्या व आयुष्याची कोणती दिशा हे माहीत नसताना उपाशी कुटुंबाला भुकेच्या अजगर मिठीतुन सोडवण्यासाठी निघालेला एक उपेक्षित ,वंचित श्रावण बाळ….

त्याचे पाऊले चालातायेत भाकरीच्या शोधात, भावनाशून्य जगातील उपहासात्मक , तुच्छतेच्या विखारी नाजरांनी जाळून टाकतायेत त्याच कोमल , निष्पाप बालपण, तो हात पसरतो आणि आम्ही मागे मागे सरकत राहतो तो लाचार,केविलवाणा होऊन अगतिकतेने पाहत राहतो आपल्या मदतीच्या हाताकडे आणि आम्ही एक ,दोन ,पाच ,दहा रुपये दिले तर देतो नाहीतर आहेतच आपल्या उपहासात्मक नजरांचे विखारी बाण त्याच्या सर्वांगावरून सोडत राहतो आणि मग तोही केविलवाणे हसतो हात पसरतो आणि आम्ही होऊ पाहतो दानशूर ...

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव यांनाही स्वाभिमानाने व स्वावलंबनाने साजरा करता येईल का ?

आज तुमच्या माझ्या समाजातील ,एका उपेक्षित वंचित ,भटक्या लेकराला खरा आधार हवा आहे शिक्षणाचा , योग्य संस्कारित पोषक व सुरक्षित वातावरण, त्यांच्या अंतरंगातील फुलू पाहणाऱ्या स्वप्नांना … पण नाही आम्ही आमच्या हम दो और हमारे दो या रेशीम कोशात हरवत चाललोय माणुसकीची,सामाजिक उत्तरदायित्व जपणारी सदभावना…

अस तर नाही ना आमची सुबत्ता ,स्थिरस्थावरता आम्हाला संवेदनाहीन ,निगरगट्ट काळजाचे तर बनवत नाही ना? आपल्या लेकरांना समानतेचे आणि एकतेचे धडे देण्या अगोदर आपण त्या रस्त्यावर चालतो आहोत का हे एकदा पाहायला हवे, स्वातंत्र्याचा आनंद घेताना कोणा एका उपेक्षितांच्या आयुष्यातील सोनेरी किरण होऊन त्यांचं अंधकारमय जीवन आपण उजळून टाकण्यासाठी प्रयत्न करूयात उद्या रस्त्यावर वाढलेल्या लेकराला गुन्हेगार म्हणून पाहताना आपण त्याचे बालपण बहरू दिले नाही ,त्याच्या पसरलेल्या हातात शिक्षणाची , पोषक व सुसंस्कारित वातावरण दिले नाही म्हणून स्वतःला दोषी ठरवायचे की सरकार, समाजसेवक , संस्था, समाज यावर ढकलत आपण शांत राहायचं हे ठरवावं लागेल.

खरच स्वतंत्र भारताचे हे उज्वल आणि दैदिप्यमान भविष्य अस परिस्थितीच्या भयाण व दाहक अंगाराने जाळून खाक होताना आपण पाहत राहायचे आणि आपण तरी काय करणार या शब्दांनी शांत बसायचे ?? स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना आपल्या लेकरांना स्वच्छ ,सुंदर कपडे घातलेले पाहून , हातात तिरंगा फडकावताना पाहून मन नक्कीच आनंदी होईल आणि ते व्हायलाच हवे पण हेच कपडे जर त्या लेकराला मिळाले आणि त्याच्या दारात शिक्षणाची गंगा पोचली की स्वातंत्र्यदिन चिरायू होईल.

कर्जाच्या काही रकमेसाठी बळीराजाच्या गळ्याभोवती असणारा फास मात्र तूटता तूटत नाही.भेगळलेल्या जमिनीसारख भेगाळून जात त्याच कुटुंब दुष्काळात कोरड्या पडलेल्या शेतासारख त्याच्या आईचे ,बायकोचे डोळे कोरडे पडतात पाहा सरकार तुमच्या माणुसकीच्या धरणातील योजनांचं पाणी त्यांच्या आयुष्याची परसबाग तरी बहरवते का ? कारण माणुसकीच्या भरलेल्या हृदयावर आणि डोळ्यातील पाण्यावर तुम्हाला आणखी कर लावता आला नाही नाहीतर तेही त्यांना दुरापास्त झाले असते.

लाखो कोटींचे घोटाळे कानावर येतात आणि आरोपी देश सोडून परागंदा होतात पण इथ उन्हात राबणारे हात तुमच्यापुढे मदतीची याचना करतात,सवलत मागतात,प्रसंगी सोने,नाने,घरदार शेतजमीन सगळ विकतात तुमचं कर्ज फेडतात नाही जमल तर स्वतःला संपवतात पण ही मातृभूमी सोडत नाही . सांगा ना सरकार मायबाप आता अमृतमहोत्सव साजरा करताना घरातील आढयाकडे पाहत लेकरांचा आधार होऊ पाहणाऱ्या त्या शेतकऱ्याच्या बायकोला तुम्ही कोणत्या तोंडाने अमृत शब्दोच्चार करत सांगणार आझादी का अमृतमहोत्सव साजरा कर म्हणणार खरच ,तुमच्यातील माणुसकीला जागून सांगा.

आजपर्यंत गरिबी निर्दालन करण्याचा, बेरोजगारी , अन्याय- अत्याचार, बलात्कार, भ्रष्टाचार, जातीभेद,धर्मभेद, लिंगभेद, पंथभेद असमानता, डावी उजवी ,समाजवादी , धर्मनिरपेक्षता यांच राजकारण करत इतरांच्या भुकेला,गरजेला, कमजोरीला,अज्ञानाला, बेरोजगारीला, अव्यवस्थेला आपला राजपदाची पायरी करणारे,त्यांच्या अगतिकतेला,लाचारीला आपले राजवस्त्र बनवणारे राज्यकर्ते होण्यापेक्षा आपण वंदनीय व पूजनीय भारतमातेचे सुपुत्र आहोत या पवित्र भूमीतून उपजलेलो आहोत याची जाण व भान ठेऊन सर्वांना एकाच समांतर विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करायला हवे . भुकेकंगाल रयतेच्या हाडामासाच्या चिखलाच्या बेबस,असहाय्य खतावर आपले राजसत्तेच्या मळ्यांना पिकवायचे काय हे तरी स्वताला एकदा विचारा

नाहीतर पुन्हा डफावर थाप मारत लोकशाहीर,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एक ललकारी द्यावी लागेल ये आझादी झुठी है,देश की जनता भुकी है…

वाचकांना व सर्व विचारवंत, समाज घटकांना विनंती आहे आपल्या अवती भोवती ज्या चांगल्या अनुकरणीय व देश हिताच्या व समाज मनाला जागे करणाऱ्या घटना ,विचार ,कविता,लेख व इतर साहित्य आपण या चला व्यक्त होऊ यामध्ये प्रसिद्ध करूयात फक्त यात कोणाचाही द्वेष, राग अथवा इतरांना त्रास होईल असे ,समाजात वाद विवाद होणारे , सामाजिक ,धार्मिक ,पंथीय भेदाभेद निर्माण करणार नसावे ही विनंती. आता तुम्हीही बिनधास्त लिहा आम्ही तुमच्या चांगल्या व समाजहिताच्या लेखनाला प्रसिद्धी देऊ

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!