Saturday, July 27, 2024
Homeक्राइमपुण्यात प्रांताधिकारी, डीवायएसपीसह तहसीलदार निलंबित..निवडणूक आयोगाची सर्वात मोठी कारवाई

पुण्यात प्रांताधिकारी, डीवायएसपीसह तहसीलदार निलंबित..निवडणूक आयोगाची सर्वात मोठी कारवाई

पुरंदरमध्ये ईव्हीएम मशीन चोरीला गेल्याची घटना

सासवड (ता. पुरंदर) येथील स्ट्रॉग रुममधून ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिट चोरीला गेले. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. या घटनेची भारत निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेत या प्रकरणात पुरंदरचे प्रांताधिकारी (उपविभागीय अधिकारी), तहसीलदार अणि उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्याविरुध्द शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.

याप्रकरणी  आयोगाने मंगळवारी रात्री पुरंदर-दौंड प्रांतधिकारी वर्षा लांडगे खत्री, तहसीलदार विक्रम रजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे, पोलीस निरीक्षक संतोष जाधव, सहायक फौजदार डी. एल. माने, गृहरक्षक दलाचे जवान राहुल जरांडे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. तसेच याबाबतचा अहवाल १२ फेब्रुवारीपर्यंत आयोगाकडे सादर करावा, अशा सूचनाही आयोगाने दिल्या आहेत. राज्यात निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार ईव्हीएम जनजागृतीचा कार्यक्रम सुरु आहे.

आगामी लोकसभा निवडणूक २०२४ साठी प्राथमिक तपासणी झालेल्या १० टक्के ईव्हीएम मशिनस प्रत्येक विधानसभा मतदारसंघात उपलब्ध करून दिल्या आहेत. या मशिन्स उपविभागीय अधिकारी यांच्या अखत्यारितीत गोडावूनमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. ईव्हीएम मशीनच्या सुरक्षिततेबाबत योग्य तो पोलिस बंदोबस्त ठेवून सुरक्षेबाबत काळजी घेण्याचे आदेश निवडणूक अयोगाने वेळोवेळी दिलेले आहेत. तथापी या आदेशाचे पालन न झाल्याने ५ फेब्रुवारी रोजी सासवड येथून ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिट चोरीस गेल्याचा गैरप्रकार समोर आला होता.

ईव्हीएम मशीन चोरीप्रकरणी चौकशी समिती स्थापन – राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कंट्रोल युनिट चोरीला गेल्याच्या घटनेची चौकशी करण्याकरिता समिती स्थापन केली आहे. यासमितीचे अध्यक्ष पुणे विभागीय आयुक्त तर सदस्य कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरिक्षक हे असणार आहे. यांनी ईव्हीएम चोरीच्या घटनेची तात्काळ सविस्तर चौकशी करून त्याबाबतचा अहवाल स्वयंस्पष्ट शिफारशींसह सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीनची चोरी झाली होती. संबंधित घटना ही सोमवारी (5 फेब्रुवारी) समोर आली होती. सासवड शहरातील तहसील कार्यालयातील स्ट्राँगरूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या होत्या. पण दोन दिवस शनिवार आणि रविवारी तहसील कार्यालयास सुट्टी होती. सोमवारी सकाळी आकरा वाजता तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्ट्राँगरूमचं कुलूप तोडण्यात आलेलं आढळून आलं.

      या ठिकाणी असलेल्या ईव्हीएम मशीनमधून एक ईव्हीएम मशीन चोरी गेल्याची माहिती समोर आली. यानंतर तहसील कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांची चांगलीच धावपळ झाली होती. सासवड पोलीस ठाण्याचे कर्मचारी, फिंगरप्रिंट एक्सपर्टची टीम, एलसीबीची टीम असे पोलिसांचे पथक या ठिकाणी दाखल झाले होते. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती. तसेच एका पोलीस अधिकाऱ्यालाही निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर आता आणखी तीन बड्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!