Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्यापुणे नगर महामार्गावर अपघातात लहान बालिकेसह एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

पुणे नगर महामार्गावर अपघातात लहान बालिकेसह एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

कोरेगाव भीमा – पुणे नगर महामार्गावर कारेगाव लगत फलके मळा येथे एका रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला कार धडकून भीषण अपघात झाल्याने सुदाम शंकर भोंडवे, सिंधुबाई सुदाम भोंडवे, कार्तिकी अश्विन भोंडवे व आनंदी अश्विन भोंडवे या एकाच कुटुंबातील चौघांचा जागेवर मृत्यू झाला असून मृतांमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीचा सामावेश आहे. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास झालेल्या या अपघातांत मोटारचालक अश्विन सुदाम भोंडवे (वय ३५) गंभीर जखमी झाले आहेत.कंटेनर चालक बबलू लहरी चौहान (रा. उत्तर प्रदेश) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे

सुदाम शंकर भोंडवे (वय ६६), सिंधुताई सुदाम भोंडवे (वय ६०), कार्तिकी अश्विन भोंडवे (वय ३२) व आनंदी अश्वीन भोंडवे (वय ४ वर्षे, सर्व रा. डोमरी, ता. पाटोदा, जि. बीड) अशी या अपघातातील मृतांची नावे असून, अश्विन सुदाम भोंडवे (वय ३५) हे या अपघातात जखमी झाले. ते मोटार चालवित होते. त्यांच्यावर कारेगाव मधील खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, अश्विन भोंडवे यांच्या चाकण येथील मेहुण्याला लग्नासाठी पाहुणे बघायला येणार असल्याने ते वडील सुदाम भोंडवे, आई सिंधुताई, पत्नी कार्तिकी व मुलगी आनंदी यांच्यासह इंडिका मोटारीतून (क्र. एमएच १२ ईएम २९७८) चाकणकडे चालले होते.

दुपारी साडेबाराच्या सुमारास फलके मळ्याजवळ पुण्याच्या दिशेने तोंड करून उभ्या असलेल्या कंटेनर (क्र. एमएच ४३ बीजी २७७६) वर त्यांची मोटार आदळली. यात अश्विन हे गंभीर जखमी झाले तर सुदाम भोंडवे, सिंधुताई व आनंदी यांचा जागीच मृत्यु झाला. या अपघाताची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी ब्रह्मा पवार, संतोष औटी, विलास आंबेकर या पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेऊन क्रेन च्या साहाय्याने कंटेनरखाली घुसलेली मोटार बाहेर काढली व स्थानिक तरूणांच्या मदतीने जखमी व मृतांना बाहेर काढले. अपघातानंतर काहीवेळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. परंतू पोलिसांनी क्रेन च्या सहाय्याने मोटार व अपघातग्रस्त कंटेनर हलविल्याने वाहतूक सुरळीत झाली.

अपघातात मोटारीचा चक्काचूर झाला, तर मोटारीत अडकून सुदाम भोंडवे, सिंधुताई व आनंदी यांचा जागीच मृत्यु झाला. कार्तिकी या गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ नगर येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. मोटार चालवित असलेले अश्विन भोंडवे हे देखील जखमी झाले असून, त्यांना उपचारार्थ कारेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघाप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी कंटेनर चालक बबलू लहरी चौहान (रा. उत्तर प्रदेश) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे..

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!