Saturday, May 25, 2024
Homeस्थानिक वार्तापिंपळे जगताप येथील गायरानात तरुणाईच्या साथीने फुलतेय वनराई.

पिंपळे जगताप येथील गायरानात तरुणाईच्या साथीने फुलतेय वनराई.

पिंपळे जगताप (ता. शिरुर) : येथे पर्यावरण दिनाच्या पार्श्वभुमीवर २१ हजार वृक्षलागवडीचा शुभारंभ करण्यात आला.

पर्यावरणदिनी २१ हजार वृक्षलागवडीचा शुभारंभ

कोरेगाव भीमा – दिनांक ७ निसर्गातील झाडांशी नाते जपणारे वृक्षमित्र तसेच वृक्षप्रेमी तरुणाई व प्रशासनातील अधिकारी यांची एकत्र साथ मिळाल्यास ओसाड गायरानातही कसे नंदनवन फुलते, याची उत्तम प्रचिती पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील गायरान क्षेत्रात फुलणारी वनराई पाहील्यास येते. पर्यावरणदिनानिमित्त तरुणाईने एकत्र येत सुमारे २१ हजार वृक्षलागवडीचा शुभारंभ केला.

पर्यावरणाचे महत्व पटु लागल्याने पिंपळे जगताप येथील ओसाड गायरान क्षेत्रावर वृक्षलागवडीसाठी गावपरिसरातीतील वृक्षमित्र एकत्र आले. त्यांना स्थानिक ग्रामस्थ, विद्यार्थी तसेच अधिकारी व पदाधिकाऱ्यांचीही साथ मिळाली. अन सर्वांनी गायरान क्षेत्रात हिरवाई फुलवण्याचा निर्धार करीत वृक्षलागवडीस सुरुवात केली. गायरानाच्या सुमारे २०० एकर उपलब्ध क्षेत्रात लागणारे खड्डे, रोपे, तसेच पाणी देण्याची पुरेशी व्यवस्था उपलब्ध नसल्याने प्रसंगी पदरमोड करुन या टिमने पहील्या टप्प्यात प्रतिकुल परिस्थितीत काम सुरु केले. त्यांचे काम पाहून पंचक्रोशीतील तरुणाई, शासकीय व खाजगी क्षेत्रातील विविध अधिकारी व पदाधिकारी, एवढेच काय तर अनेक लहानगेही या मोहिमेत सामील झाले. आणि दररोज पाणी देण्यासह विविध कामात सहभागी होवू लागले. अन्‌ सुमारे सुमारे पाच हजार देशी झाडांची लागवडही झाली. अनेक प्रकारची फळझाडे तसेच भरपूर ऑक्सिजन व सावली देणाऱ्या या झाडांना शेजारीच असलेल्या गावतलावातून पाईपलाईनद्वारे पाणी आणून ठिबकसिंचनही सुरु झाले. अन पाहता पाहता या ओसाड माळरानावर हिरवाई फुलु लागली.

पर्यावरण संवर्धनाच्या या कामाला पाठबळ देण्यासाठी लोकप्रतिनिधी, परिसरातील प्रथितयश उद्योजक तसेच प्रशासनातील उच्चपदस्त अधिकारी व पर्यावरण क्षेत्रातील तज्ञांनीही येवून या कामाचे कौतुक केले. तसेच या कामाची व्याप्ती वाढवण्यासाठी येथील उद्योजक सागर भाडळे, राहुल गव्हाणे आदींसह अनेकांनी मदतीचा हातही पुढे केला. अन् या पावसाळ्यात महिन्याभरात सुमारे २१ हजार झाडे लावण्याची माेहिम आखण्यात आली. त्यानुसार पर्यावरण दिनाच्या पार्श्वभुमीवर काल पाच जुनपासून ते येत्या पाच जुलै दरम्यान २१ हजार झाडे लावण्याचा नियोजनबद्ध कार्यक्रम आखून काल अनेक मान्यवरांंच्या उपस्थितीत त्यांचा उत्साहात शुभारंभही करण्यात आला.

यावेळी परिसरातील डॉक्टर मंडळींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कामांसाठी खड्डे घेणे, देशी झाडांची रोपे उपलब्ध करुन ती लावणे, ठिंबक पाण्याची व्यवस्था यासह वृक्षारोपण सुरु झाले असून पर्यावरणप्रेमींनीही या माेहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन या कामी पुढाकार घेणारे वृक्षमित्र व माहितीसेवा वृक्षसंवर्धन समितीचे शिरुर तालुकाध्यक्ष धर्मराज बोत्रे तसेच माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी केले आहे. वाढत्या प्रदुषणाच्या पार्श्वभुमीवर पर्यावरण रक्षणासाठी पिंपळे जगताप येथील वृक्षसंवर्धनाचे हे काम इतर गावांनाही मार्गदर्शक ठरणार आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!