शिक्रापूर – केंदुर ( ता.शिरूर)
आठ महिन्यांपूर्वी तब्बल ३० कृषी-विद्यूत मोटारी चोरणारी टोळी पाबळ-केंदूर भागातून शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केल्यानंतर हा प्रकार पूर्ण थांबलेला होता. मात्र दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा पाबळ-केंदूरच्या दरम्यान असलेल्या महादेववाडीतून ७.५ एचपीची कोरी करकरीत विद्यूत मोटार चोरीला गेल्याने या भागातील शेतकरी पुन्हा चिंतेत पडले आहेत. गेल्या तीन वर्षांमध्ये जशा मोटारी चोरीला जायच्या तशाच पध्दतीने सदर मोटार चोरी गेल्याची तक्रार शेतकरी शिवाजी डेरे यांनी शिक्रापूर पोलिसांकडे केली आहे.
याबाबत तक्रारदार शिवाजी भालचंद्र डेरे (वय ७३, रा.डेरेवस्ती, महादेववाडी, केंदूर, ता.शिरूर) यांनी सांगितले की, आपण आपल्या वेळनदी तिरी असलेल्या विहीरीवर नुकतीच ७.५ एचपी क्षमतेची अगदी नवीन मोटार जोडली होती. या मोटारीसाठी संपूर्ण विद्यूतसंचही नवीन टाकला होता. मात्र मोटार बसवून एकच दिवस होत नाही तर ११ तारखेच्या मध्यरात्री सदर मोटार त्यासोबत असलेल्या सर्व वायरी व तत्सम साहित्यांसह चोरीला गेली. चोरीला गेलेल्या संपूर्ण साहित्याची किंमत सुमारे ५० ते ६० हजार एवढी असल्याचेही श्री डेरे यांनी सांगितले.
दरम्यान केंदूर-पाबळ परिसरातून आठ महिन्यांपूर्वी कृषीपंप चोरणारी टोळी जेरबंद केली होती. सदर टोळीत स्थानिक युवक असल्याने पुढील काळात या भागातील कृषीपंप चो-या बंद झाल्या होत्या. मात्र नवीकोरी विद्यूत मोटार बसविलेल्या दूस-याच दिवशी चोरी गेल्याने पुन्हा एकदा पाबळ-केंदूर परिसरातील शेतकरी भितीच्या सावटाखाली आहेत. सदर चोरीची तक्रार श्री डेरे यांनी ऑनलाईन पध्दतीने केली असून शिक्रापूर पोलिस अधिक तपास आहेत.