पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल..पोलिसांनी केली पतीला अटक
लोणीकंद (ता.हवेली) चारित्र्यावरील संशयातून पतीने पत्नीला उंदीर मारण्याचे औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरातील लोणीकंद परिसरात घडली.याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी पतीसह ६ जणांवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे आरोपी हनुमंत गिरी याच्यासोबत सप्टेंबर २०१८ मध्ये लग्न झाले आहे. महिला तिच्या सासरी नांदत असताना आरोपींनी मानसिक व शारीरिक त्रास दिला. तसेच आरोपी पतीने कोणत्या ना कोणत्या कारणावरुन महिलेला हाताने मारहाण केली. तर इतर आरोपींनी महिलेच्या चारित्र्यावर संशय घेतला. रविवारी सकाळी आठच्या सुमारास सासरच्या लोकांनी महिलेचे हातपाय पकडले.
यानंतर पतीने महिलेला जीवे मारण्याच्या उद्देशाने उंदीर मारण्याचे विषारी औषध पाण्यात मिसळून ते पाणी बळजबरीने पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे
यावरुन पती हनुमंत अंकूश गिरी, सासू सरस्वती अंकूश गिरी, सासरे अंकूश रामभाऊ गिरी (रा. सुलतापूर, जि. बीड), दिर आदित्य अंकूश गिरी, ननंद सुजाता प्रल्हाद भारती, पतीचा मामा शिवाजी भारती (सर्व रा. मु.पो. सोन्ना ता. वडवणी, जि. बीड) यांच्यावर गुन्हा दाखल करुन पती हनुमंत गिरी याला अटक केली आहे.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भालेराव करीत आहेत.