पुणे – चंदननगर (ता.हवेली) येथे एक धक्कादायक व माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला असून जन्मदात्या ४० वर्षीय बापानेच पोटच्या १६ वर्षीय मुलीवर सातत्याने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना वडगाव शेरी परिसरात घडली.असूनयाप्रकरणी पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून नराधम बापाला अटक केली आहे. याप्रकरणी १६ वर्षीय पीडित मुलीने शुक्रवारी (दि. २२) चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ड्रायव्हर असून त्याने स्वत:च्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केले. आरोपीने पीडित मुलीला मारहाण करुन घरी कोणी नसताना वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच तिला गोळ्या खायला दिल्या. मुलीने गोळ्या खाल्ल्या नाही तर तो जबरदस्तीने तिला गोळ्या खायला घालत होता. तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर आई, बहीण व भावाला जीवे मारण्याची धमकी देत होता. या प्रकाराबाबत पोलिसांकडे तक्रार केली तर पोलिसांना मारून टाकीन अशी देखील धमकी नराधम देत होता.
शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास आरोपीने पीडित मुलीवर अत्याचार केले. बापाकडून वारंवार होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून तिने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन नाराधम बापाला अटक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत माने करत आहेत.