आळंदी – आळंदी (ता. खेड) येथील इंद्रायणी नदीकाठी भागेश्वरी धर्मशाळा ट्रस्टच्या मोकळ्या जागेत महिलेच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला असून ही घटना शनिवारी दि. २० एप्रिल रोजी सकाळी आळंदी येथे उघडकीस आली आहे.खून झालेल्या महिलेची ओळख पटली नाही. याप्रकरणी पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर घुले यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी मधील इंद्रायणी नदीकाठी भागेश्वरी धर्मशाळा ट्रस्टच्या मोकळ्या जागेत एका महिलेचा मृतदेह शनिवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास आढळला. घटनेची माहिती मिळताच दिघी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. महिलेच्या डोक्यावर गंभीर जखमा आढळून आल्या. त्यामुळे अज्ञात व्यक्तीने महिलेच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दिघी पोलीस तपास करीत आहेत.