हिंदी जनसामान्यांची भाषा होणे काळाची गरज – डॉ. नानासाहेब जावळे
तळेगाव ढमढेरे – दिनांक १७ हिंदी ही व्यवहाराबरोबरच जनसामान्यांची भाषा बनण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयाच्या हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. नानासाहेब जावळे यांनी केले. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात हिंदी दिना निमित्त आयोजित केलेल्या उपक्रम सप्ताहाच्या समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. शिक्षण प्रसारक मंडळ व विद्या सहकारी बँकेचे विद्यमान संचालक महेशबापू ढमढेरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक नवले, हिंदी विभाग प्रमुख डॉ. मनोहर जमदाडे या प्रसंगी उपस्थित होते.
डॉ. जावळे यांनी कोणतीही भाषा ही श्रेष्ठच असते, आजच्या तंत्रज्ञानाच्या काळातही अधिकाधीक भाषांचे ज्ञान असणे वैभवशाली बाब आहे. देशामध्ये सर्वाधिक प्रांतात बोलली जाणारी हिंदी ही एकमेव भाषा आहे. हिंदी भाषेमध्ये निर्माण होणारे कोणतेही साहित्य श्रेष्ठ दर्जाचे असून जास्तीत जास्त युवकांनी हिंदी साहित्याकडे वळण्याचा आग्रहही डॉ. जावळे यांनी व्यक्त केला. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महेश ढमढेरे यांनी हिंदी भाषेचा गौरव केला. हिंदी ही सहज आणि सुंदर भाषा असून आपल्या सर्वांनी व्यवहारात तीचा अधिकाधिक वापर करणे गरजेचे आहे. मराठी माणसाने कोणताही न्यूनगंड न बाळगता मातृभाषेबरोबरच हिंदी भाषेचाही सन्मान करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. महाविद्यालयातील हिंदी विभागाने हिंदी दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या हिंदी सप्ताहातील विविध उपक्रमांचे कौतुक केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक नवले यांनी मनोगत व्यक्त केले. हिंदी विभाग प्रमुख डॉ. मनोहर जमदाडे यांनी आपल्या प्रास्ताविकात हिंदी सप्ताह आयोजनामागील भूमिका विशद केली. या विशेष सप्ताहा अंतर्गत महाविद्यालयात गेली सात दिवस विविध उपक्रम आयोजित केले गेले. त्यामध्ये हस्ताक्षर लेखन, रांगोळी, निबंध, पोस्टर सादरीकरण, पी. पी. टी. सादरीकरण , व वक्तृत्व इत्यादी विविध स्पर्धांचे यशस्वीरित्या आयोजन केले गेले. या स्पर्धांत सहभागी झालेल्या विजेत्यांना या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रथम वर्ष वाणिज्य या वर्गातील विद्यार्थिनी प्रतिभा सासवडे व सृष्टी कामठे यांनी सूत्रसंचालन तर साक्षी रणसिंग या विद्यार्थिनीने आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. संदीप सांगळे, डॉ. पराग चौधरी, डॉ. सोमनाथ पाटील, डॉ. दत्तात्रय वाबळे, डॉ. रवींद्र भगत, डॉ. अमेय काळे, प्रा. मिनाक्षी दिघे, प्रा. अजिता भूमकर, प्रा. केशव उबाळे, प्रा. दत्तात्रय कारंडे, प्रा. जनार्धन गिरीमकर, प्रा. अविनाश नवले आदींनी विशेष परिश्रम घेतले.