रांजणगाव (ता.शिरूर) आगामी शिरूर लोकसभा निवडणुकीत मनसेचा झेंडा फडकावायचा असून मनसे संस्थापक राज ठाकरे यांचा सर्वांगीण विकासाचा विचार व मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी असणारा प्रेरणादायक कृतीयुक्त विचारांचा लढा सर्वसामान्य व तळागाळातील नागरिकांपर्यंत पोचवण्यासह त्यांना न्याय देण्याचे काम करायला हवे असे प्रतिपादन रांजणगाव येथील मनसे पदाधिकारी मार्गदर्शन व नियुक्ती वेळी पुणे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर यांनी केले.
रांजणगाव येथे नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पदाधिकारी मार्गदर्शन व नियुक्ती बैठकीवेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष दरेकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अभिप्रेत पक्ष संघटना बांधणीसाठी कटीबद्ध असून, पुणे जिल्ह्यातील प्रत्येक गावातील कल्पक, होतकरू व कार्यक्षम तरूणांना राज ठाकरे यांचे सामाजिक परिवर्तनाचे व नवनिर्माणाचे विचार पटवून देताना त्यांना पक्षाच्या झेंड्याखाली संघटीत करण्यासाठी या पदाच्या माध्यमातून प्रयत्न करूयात व सर्वसामान्यांच्या मनात आपली व पक्षाची प्रतिमा तयार करत पक्ष वाढीसाठी प्रयत्न करा असे आवाहन जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर यांनी केले.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर , पुणे शहर उपाध्यक्ष हेमंत बत्ते, मनसे शिरूर हवेलीचे तालुकाध्यक्ष तेजस यादव यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. मनसेच्या शिरूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे झालेल्या बैठकीत शिरूर – हवेली तालुकाध्यक्ष तेजस यादव,शिरूर -आंबेगाव तालुकाध्यक्ष नानासाहेब लांडे, मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल खेडकर, शिरूर शहर सचिव रवीराज लेंडे, सणसवाडी माजी ग्राम पंचायत सदस्य संतोष नरके आदी यावेळी उपस्थित होते.