Saturday, July 27, 2024
Homeइतरट्रॅन्टर इंडिया प्रा. लि. कंपनीविरुद्ध कामगारांचे कुटुंबासह आमरण उपोषणाला सर्व स्तरातून...

ट्रॅन्टर इंडिया प्रा. लि. कंपनीविरुद्ध कामगारांचे कुटुंबासह आमरण उपोषणाला सर्व स्तरातून पाठिंबा

कामगारांच्या उपोषणबाबत आमदार अशोक पवार यांनी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांची घेतली भेट

कोरेगाव भीमा : डिंग्रजवाडी ( ता . शिरुर ) येथील ट्रॅन्टर कारखाना व्यवस्थापनाने कामावरून काढल्याच्या निषेधार्थ कारखान्यातील १० कायम कामगारांनी कुटुंबांसह सुरू केलेल्या आमरण उपोषणास लोकप्रतिनिधी तसेच विविध पक्ष संघटनांसह सर्व सणसवाडी व डिंग्रजवाडी ग्रामस्थांनीही एकजुटीने पाठिंबा व्यक्त केला आहे . कामगारांसह ग्रामस्थही उपोषणास बसले आहेत .

ट्रॅन्टर इंडिया कारखाना व्यवस्थापनाने १६.१०.२०२० रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता १० कायम कामगारांना कमी केले . त्यांच्या जागेवर ३०कंत्राटी कामगार कामावर घेतले . त्यामुळे बेरोजगार झालेल्या कायम कामगारांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊन उपासमार होत आहे . आजवर या कामगारांनी कोणत्याही कामास नकार न देता कंपनीच्या प्रगतीसाठी परिश्रम घेतले , मात्र कारखाना व्यवस्थापनाने केवळ चर्चेची आश्वासने देत कामगारांना आशेवर ठेवले. या प्रश्नी संघटनेने सनदशीर मार्गाने लेबर ऑफिस तसेच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून चर्चेचा प्रयत्न करूनही गेली१७ महिने विविध कारणे सांगून व्यवस्थापनाकडून टाळाटाळ होत आहे . अखेर कंटाळून कायम कामगारांनी २८ तारखेपासून कारखानास्थळावरच कुटुंबीयांसह आमरण उपोषण सुरू केले आहे .

आमदार अशोक पवार यांनी उपोषणाबाबत कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांची घेतली भेट – कामगारांच्या आमरण उपोषणाबाबत दखल घेत आमदार अशोक पवार यांनी याप्रश्नी पुढाकार घेत कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा केला . मंत्री मुश्रीफ यांनी पुण्याच्या अप्पर कामगार आयुक्तांना याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत . या कामगारांना कामावर घेण्यासाठी कंपनीला सूचना देण्याबाबत आमदार अशोक पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या विनंतीनुसार शुक्रवार दिनांक ४ रोजी कंपनी व्यवस्थापक तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकही आयोजित करण्यात आली आहे .

कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते व परिसरातील ग्रामस्थांनीही एकजुटीने पाठिंबा व्यक्त केला आहे . गुरुवारी उपोषणाच्या चौथ्या दिवशीही काहीच निर्णय न झाल्याने कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत असून आंदोलनकर्त्या महिलांची प्रकृती खालावल्याने त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली . याबाबत कारखाना व्यवस्थापनाची बाजू जाणून घेण्याचा सातत्याने प्रयत्न करूनही व्यवस्थापनाकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही .

कामगार कुटुंबीयांचा आत्महत्येचा इशारा – दबाव आणला तर घरी जाऊन आत्महत्या करू १० कायम कामगारांना काढून टाकले असल्याने उपोषणास बसले असूनही व्यवस्थापनाने आमची दखल कोणी घेतली नाही . जर पोलीस यंत्रणेने किंवा कोणी आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही घरी जाऊन आत्महत्या करू असे सांगत त्यास पोलीस व कंपनी व्यवस्थापन जबाबदार राहिल , असे सांगितले .

कामगार कुटुंबीय आमरण उपोषणाला बसल्यानंतर सातत्याने आमदार अशोक पवार संपर्कात असून माजी सभापती व जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांनी भेट देत कामगारांना दिलासा दिल्याने नागरिक व कामगार यांनी आमदार दाम्पत्याच्या या माणुसकी बाबत समाधान व्यक्त केले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!