संतत धार पावसाने शेतातही पाणी , फुलाला भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी – सांगा सरकार मायबाप दिवाळी सण साजरा करायचा कसा ???
कोरेगाव भीमा – शिक्रापूर ( ता.शिरूर) येथील २४ व्या मैलावरील शेतकऱ्याने झेंडूच्या फुलाला चांगला बाजार भाव मिळेल या मोठ्या अपेक्षेने झेंडूची लागवड केली .दसऱ्याला मोठ्या प्रमाणात भाव मिळेल अशी अपेक्षा बाळगून असलेल्या शेतकऱ्याच्या पदरी निराशा पडली तर दिवाळीच्या सणाला तरी बाजार भाव मिळेल या आशेवर असलेल्या बळीराजाच्या अपेक्षांचा हिरमोड झाला असून परतीच्या पावसाने झेंडूचे व फुलशेतीचे अतोनात नुकसान झाले असून ऐन सणासुदीच्या काळात संतत धार पावसाने शेतातही पाणी , फुलाला भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी – सांगा सरकार मायबाप दिवाळी सण साजरा करायचा कसा ??? असा प्रश्न दाटलेल्या कंठाने बळीराजा करत आहे.
शेतकरी मोठ्या प्रमाणावर फुलशेती करतात. कारण कमी वेळेत जास्त उत्पन्न देणारे हे पीक आहे. मात्र, यावेळी आर्थिक नुकसान झाले आहे. एकीकडे संतत धार पडणारा पाऊस शेतात पिके खराब करत आहे तर दुसरीकडे खराब झेंडू विकता येईना की ठेवताही येईना अशी द्विधा अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.परतीच्या पावसामुळे झेंडूच्या फुलांचे मोठे नुकसान झाले आहे. खराब फुलांमुळे भाव घटले आहेत. फुलांचे नुकसान झाल्याने शेतकर्यांचे कष्ट वाया गेले आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर मोठे नुकसान झाल्याने शेतकर्याच्या डोळ्यात पाणी आले.शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. दसरा व दिवाळी सणाच्या काळात शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे.
सणासुदीत चांगला नफा मिळेल, अशी खूप मोठी आशा होती, सतत पडणाऱ्या पावसाने अपेक्षांवर पाणी फिरवले आहे. अडीच एकर झेंडूच्या शेतीत सध्या उत्पादन खर्चही भागणार नाही फक्त नवरात्र व दसऱ्याला समाधानकारक बाजारभाव मिळेल या आशेवर झेंडूची फुले फुलविली. मात्र सध्या पावसामुळे फूल शेतीलाही मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका बसला आहे.सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करायला हवी.
– नामदेव ताजने, शेतकरी, २४ वा मैल,शिक्रापूर