शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार व सकल मराठा परिवार यावेळी उपस्थित
- निवेदनातील प्रमुख मागण्या
- १) या घटनेला जे पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी जबाबदार आहेत त्यांना निलंबित करून, त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्यांचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक केली जावी.
- २) मराठा आरक्षणासंबधित आंदोलकांवर आत्तापर्यंत दाखल झालेले गुन्हे सरसकट मागे घेण्यात येऊन सर्वसामान्य मराठी कुटुंबे उध्वस्त होण्यापासून वाचवावे.
- ३)’ मराठा आरक्षणाचा ‘ प्रश्न तातडीने मार्गी लावावा.
- ४)कोपर्डीमध्ये ज्या भगिनीवर अत्याचार झाला तिला न्याय मिळाला नसून तिला न्याय मिळावा.
- ५)प्रशासनात जी मराठाविरोधी अधिकाऱ्यांची लॉबी तयार झाली आहे, तिला मराठा समाजाच्या प्रश्नांवर काम करण्यास बंदी घालावी.
जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत होते यावेळी मराठा बांधवांवर लाठीहल्याचा निषेध राज्यभरातून करण्यात येत असून शिरुर तालुक्यात सकल मराठा परिवाराच्या वतीने लाठी हल्ल्याचा निषेध करीत तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना निवेदन देण्यात आले असून याची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शजनदे व उपमुख्यमंत्री यांना पाठवण्यात आली आहे.
या निवेदनात सकल मराठा परिवाराच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात,’ मराठा बांधव हे आपल्या वर्षानुवर्षच्या प्रलंबित मागणीसाठी अतिशय शांततापूर्ण मार्गाने उपोषण आणि आंदोलन करीत होते. स्वहक्कासाठी अतिशय शांततापूर्ण पद्धतीने मराठा समाज आतापर्यंत अनेक आंदोलने आणि मोर्चे काढत आला आहे. एवढे लाखोंनी मोर्चे निघाले तरी एक अनुचित घटना कुठे घडल्याचे ऐकिवात नाही किंवा त्याची नोंद नाही. मग आता असे कोणती घटना घडली की, पूर्णपणे जो समुदाय जमला होता त्यांच्यावर रक्त येईपर्यंत लाठीचार्ज करावा लागला. समाजमाध्यमांत जे व्हिडिओ फिरत आहेत. त्यात स्पष्ट दिसून येत आहे की, पोलीस मोठा फौजफाटा घेऊन दंगल नियंत्रक उपकरणासह तिथे आले होते. जर उपोषण करणाऱ्या व्यक्तीला हॉस्पिटल मध्ये न्यायचे होते तर तर एवढा मोठा पोलिसाचा ताफा होता का ? आपले सरकार मधील मंत्री १० – १२ पोलीस होते असे सांगून सत्यपरिस्थिती लपवीत आहेत. हा अमानुष लाठीचार्ज झाला, तो विनाआदेश होऊच शकत नाही. सकल मराठा परिवार या घटनेचा तीव्र निषेध करीत आहे. या घटनेला जे पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी जबाबदार आहेत त्यांना निलंबित करून, त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्यांचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक केली जावी ही सकल मराठा परिवाराची पहिली मागणी आहे.
मराठा समाज आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक आंदोलन करीत आला आहे. या आंदोलनादरम्यान अनेक मराठा लोकांवर अमानुष आणि कठोर कलमे लावून गुन्हे दाखल केले आहेत. हे सर्व गुन्हे सरसकट रद्द केले जावे ही आमची दुसरी मांगणी आहे, असे गुन्हे दाखल झाल्यामुळे अनेक सामान्य कुटुंबे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. या तरुणांवर इतर कोणतेही गुन्हे दाखल नाहीत, फक्त समाजासाठी रस्त्यावर उतरले म्हणून त्यांच्यावर असे गुन्हे दाखल होणे योग्य वाटत नाही. त्वरित अशा सर्व तरुणांना निर्दोष मुक्त करावे ही संपूर्ण सकल मराठा परिवाराची मागणी आहे. याचसोबत ज्यासाठी हि घटना घडली ते म्हणजे ‘आरक्षण’ लवकरात लवकर निकाली काढण्यात यावे. यासाठी जे काही करावे लागेल ते तातडीने करण्यात यावे. वारंवार उपोषणे आंदोलने होत आहेत ती हा प्रश्न सुटल्याशिवाय बंद होणार नाही. ५८ क्रांती मोर्चे निघाले होते ते ज्या कारणासाठी निघाले होते त्या कोपर्डीच्या घटनेवर आज शासन बोलायला तयार नाही. कोपर्डीमध्ये ज्या भगिनीवर अत्याचार झाला तिला न्याय मिळाला नसून तिला न्याय मिळावा हीसुद्धा आमची मागणी आहे. प्रशासनात जी मराठाविरोधी अधिकाऱ्यांची लॉबी तयार झाली आहे, तिला मराठा समाजाच्या प्रश्नांवर काम करण्यास बंदी घालावी.
सकल मराठा परिवार प्रत्येक प्रश्न सामोपचाराने सोडविण्यास प्रशासनाला पुरेपूर मदत करील. पण अंतरवली सारखी वागणूक प्रशासनाने दिली तर मात्र त्याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत. संपूर्ण सकल मराठा परिवार या घटनेचा तीव्र निषेध करीत आहे. आपण यावर योग्य ती कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
याप्रसंगी शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार, उद्योजक व सकल मराठा परिवाराचे शिरूर तालुका समन्वयक प्रमोद भंडारे, प्रदीप बेंडभर, सचिन शिंदे, किरण थिटे, नागेश ढोकले, प्रमोद आरगडे, सुनील इंदूलकर, अमोल तांबे, अक्षय सोंडेकर, शामकांत वर्पे, चेतन दाते, अतुल आरगडे,यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.