संभाजी ब्रिगेडची मागणी ; पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांना दिले निवेदन.
पुणे -पिंपरी
सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्याविषयी अपशब्द वापरून राष्ट्रपुरुष व राष्ट्रमाता यांचा अनादर केल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन देत संबधित विलास जोशी या व्यक्तीवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी विलास जोशी नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर अपशब्द वापरून अनादर केला आहे. या संबधीत व्यक्तीचा शोध घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांना त्याबाबत निवेदन दिले आहे. कारवाई न केल्यास संभाजी ब्रिगेड स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा देखील संभाजी ब्रिगेडने निवेदनाद्वारे दिला.
सदर निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सतिश काळे कार्याध्यक्ष ज्ञानदेव लोभे सचिव संजय जाधव उपाध्यक्ष नितीन जाधव यांनी निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.
संभाजी ब्रिगेडने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल महाराष्ट्र राज्यासह देशभरात आदराचे स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राबवलेली धोरणे ही सर्वसामान्य, गोरगरीब, सर्वच जाती धर्मांसाठी उपयुक्त ठरली आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत सर्वच जाती धर्माच्या लोकांमध्ये प्रेमाची व आपुलकीची भावना आहे. असे असताना समाजात काही विकृत समाजकंटक लोक सोशल मीडियाचा आधार घेत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना वेळीच रोखणे गरजेचे आहे.
विलास जोशी नावाच्या एका समाजकंटकाने सोशल मिडियाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज तसेच राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या विषयी अपशब्द वापरले आहेत. तसेच अत्यंत गलीच्छ भाषेचा वापर केला आहे. या जोशी नावाच्या समाजकंटकांने वापरलेली भाषा ही सर्वांना चीड आणणारी आहे. समाजात सामाजिक सलोखा असताना अशी वक्तव्य केल्याने सामाजिक तेढ निर्माण होऊ शकते. त्यामुळे या विलास जोशी नावाच्या सोशल मीडियावरील व्यक्तीला त्वरित शोधून काढून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याचेवर कडक कारवाई करण्याची मागणी पोलिस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.