Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्याकोल्हे-लांडगेंच्या धुम्मचक्रीत आढळरावांना उमेदवारी सेनेची की भाजपाची

कोल्हे-लांडगेंच्या धुम्मचक्रीत आढळरावांना उमेदवारी सेनेची की भाजपाची

पुणे ता.८
शिरुर लोकसभा मतदार संघातून सन २००४ पासून शड्डू ठोकुन उभे राहिलेले व खासदारकीची हॅट्रीक केलेले शिंदे सेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव सन २०१९ मध्ये पराभूत होवूनही पुन्हा उमेदवारीच्या रिंगणात उभे ठाकलेले आहेत. राष्ट्रवादीपुढेही पुन्हा सन २०१९ सारखा उमेदवारीचा पेच उभा ठाकल्याने विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनाच उमेदवारी देण्याचे दस्तुरखुद्द शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केलेय. आता त्यातच भरात भर म्हणून की काय, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना भाजपाने नुकतेच शिरुर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक प्रमुख म्हणून जाहीर केलेय. आधीच लांडगेंची शिरुरमध्ये उमेदवारीची शक्यता बोलली जात असताना त्यांनाच निवडणूक प्रमुख केल्याने भाजपाकडून नेमके कोण लांडगे की, आढळराव हा मोठा संभ्रम तयार झाला आहे.
सन २००४ पासून सलग तीन लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादीला धुळ चारणा-या शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांना राष्ट्रवादीने डॉ.अमोल कोल्हे यांना निवडणूकीत उतरवून सन २०१९ मध्ये पराभूत केले. कोल्हेंच्या निमित्ताने आढळराव यांना हरविणारा उमेदवार राष्ट्रवादीला तब्बल १६ वर्षांनी सापडला. अशातच आता सन २०२४ लोकसभेसाठी कोल्हेंनी जर काही निवडणूकीच्या रिंगणातून बाहेर जाण्याची घोषणा करताच दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच कोल्हे यांना उमेदवारीचे आदेश दिल्याने दोन दिवसांपूर्वी कोल्हेंनी आपला सुर बदलला. पर्यायाने सन २०२४ लोकसभा कोल्हे विरुध्द आढळराव अशीच होणार हे जवळपास निश्चित झाले होते.

भाजपाचा आढळरावांच्या पायात पाय
अशा पध्दतीने शिरुरमध्ये कोल्हे-आढळराव असे तुल्यबळ चित्र ब-यापैकी स्पष्ट झाले असले तरी आढळराव यांना उमेदवारी शिवसेनेची की, भाजपाची हे स्पष्ट होत नसल्याने शिरुरमध्ये भाजपाकडून संभ्रम निर्माण केला जात असल्याची चर्चा एव्हाना मतदार संघात चांगलीच रंगलीय. अशातच आता भाजपाने आणखी एक नियुक्ती बॉम्ब टाकीत आढळराव यांच्याच पायात पाय घातला तो असा की, शिरुरमधून भाजपाकडून सर्वाधिक चर्चेत असलेले भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यावर शिरुर लोकसभा मतदार संघाची संपूर्ण जबाबदारी टाकीत त्यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली.

पैलवान महेश लांडगेंची फिरकी
कधीकाळी भोसरी विधानसभा मतदार संघातील सेनेच्या उमेदवारीसाठी आढळरावांकडे ये-जा करणारे लांडगे यांचे भाजपातील स्थान पक्के झाल्याने आणि ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गोटातील प्रमुख आमदार झाल्याने शिरुर लोकसभा मतदार संघातील ब-याच कांड्या महेश लांडगेंकडे आल्या आहेत. त्यातच लांडगे हे गेल्या दोन पंचवार्षिक पासून शिरुरमधून भाजपाचे उमेदवार होणार म्हणून चर्चा होत आल्या आहेत. त्यामुळे भाजपा-सेना उमेदवारीच्या रस्सीखेचेत आढळरावांचे सर्वात मोठे उमेदवारी प्रतिस्पर्धी म्हणून लांडगे यांचेच नाव पुढे आहे. मात्र एवढे होत असताना मागील आठवड्यात लांडगेंनी खेडमधील एका कार्यक्रमात आढळराव यांच्या उमेदवारीच्या पाठीशी आपण भक्कम उभे राहणार असल्याचे जाहीर केल्याने लांडगेही आता चांगलेच राजकीय फिरकी सम्राट झालेत. आता मात्र त्यांचेकडेच संपूर्ण मतदार संघाची जबाबदारी पक्षाने टाकल्याने लांडगेंची ही फिरकी आढळरावांसाठी मोठी कसोटी ठरणारी आहे.

आणि उबाळे-लांडेंनी सोडला असेल सुटकेचा नि:श्वास
महेश लांडगे यांची भोसरीवरील पक्की मांड राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडें आणि या मतदार संघातून सेनेकडून प्रमुख इच्छुक असलेल्या सुलभा उबाळे यांचे राजकीय भवितव्यासाठी मोठे अडसर आहे. त्याच मुळे लांडे यांनी काही दिवसांपूर्वी शिरुर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागितल्याची चर्चा होती. आता मात्र लांडगे यांना भाजपाने थेट शिरुर लोकसभा मतदार संघ निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्त केल्याने लांडगे हे हमखास शिरुरचे उमेदवार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचा परिणाम असा की, आता पुन्हा एकदा माजी आमदार विलास लांडे व शिवसेनेच्या प्रमुख इच्छुक सुलभा उबाळे यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असणार हे नक्की.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!