- भक्तिचिये पोटी बोध काकडा ज्योति |पंचप्राण जीवे – भावे ओवाळू आरती ||१||
- ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा |दोन्ही कर जोडोनि चरणी ठेविला माथा ||२||
- काय महिमा वर्णू आता सांगणे ते किती |कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती ||३||
कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथील श्री विठ्ठल रुक्मिणी व मारुती मंदिरामध्ये कोजागिरी पौर्णिमेपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत महिनाभर सुरू असलेल्या काकडा आरतीची भीमा नदीला दिवे सोडून सांगता करण्यात आली. पहाटेच्या वेळी चातुर्मासात पांडुरंगाला जागे करण्यासाठी महिनाभर वारकरी काकडा आरती करत असतात. काकड्याची मोठ्या भक्तिभावाने मृदुंग, टाळ, वीणा वादन, गजर करीत, मुखाने हरिनामाचा जयघोष करून विविध प्रकारच्या अभंगांच्या भक्तिगीतांच्या तालावर पांडुरंगाचा धावा करून प्रसन्न करणाऱ्या काकडा आरतीची ग्राम प्रदक्षिणा करून मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली.
दरवर्षी कोजागिरी पौर्णिमा म्हटले कि, आपल्या डोळ्यासमोर प्रथम येते ते, चंद्राचे शीतल प्रकाश आणि आकाशात लुकलुक करणाऱ्या पांढऱ्या शुभ्र चांदण्या. या निमित्त सर्वत्र उत्साह तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र हीच कोजागिरी पौर्णिमा सांप्रदायिक क्षेत्रामध्ये पांडुरंगाची भक्ती करणाऱ्या भाविकांसाठी आणि वारकरी संप्रदायासाठी अनन्य साधारण महत्व असणारी अशी पौर्णिमा आहे. कारण हि पौर्णिमा झाली कि, लगेचच त्याच पहाटेपासून भक्तिगीतांचा कार्यक्रम सुरु होतो. तो काही एक, दोन दिवस नसतो, तर संपूर्ण महिनाभर असतो.
यानिमित्त दररोज पहाटे तीन वाजताच प्रत्येक मंदिरांमध्ये भक्तिगीते सुरु होतात. सर्व भजनी मंडळे मोठ्या उत्साहात आणि आनंदाने भक्तीरसांत अक्षरशः न्हाऊन निघतात.पहाटे नियमितपणे विठ्ठल – रुख्मिणी मूर्तींना काकडा आरती ओवाळून ग्रामस्थांच्या वतीने विधिवत अभिषेक करून महापूजा करण्यात आली. दररोज नवीन व सुंदर पोशाख परिधान करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करण्यात आले. मंदिरात यानिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला.
कोरेगाव भीमा येथे काकड आरतीसाठी नित्यनेमाने अशोक घावटे, अर्जुन गव्हाणे,बाबसाहेब गव्हाणे, भाऊसाहेब ढेरंगे, रवींद्र गोसावी, माजी उपसरपंच राजाराम ढेरंगे,म्हस्कू शिवले,शहाजी ढेरंगे, सुखदेव ढेरंगे, बोरसे काका, बबन घावटे, रवींद्र गोसावी , पखवाज वादक राजेंद्र शिपलकर ,हर्षक खेडकर, देवराम ढेरंगे , संपत ढगे,दिलीप ढेरंगे ,नितीन पोपट गव्हाणे, बाळासाहेब ढेरंगे, प्रकाश खैरमोडे, बाबुलाल पोटफोडे,विवेक ढेरंगे, भामाबाई गव्हाणे,संगीता ढेरंगे, देशमुख काकू, कोकीळ काकू इतर भाविक , ग्रामस्थ , भजनी मंडळी उपस्थित होते.