आरोपींना शिक्रापूर पोलिसांनी तात्काळ ठोकल्या बेड्या, नागरिकांकडून पोलिसांच्या कामाचे कौतुक
कोरेगाव भीमा – दिनांक २३ मार्च
कोरेगाव भीमा (ता. शिरूर ) येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडून त्यातील रक्कम चोरणाऱ्या तारिफआस महम्मद खान व रईस नस्सर अहमद या दोन आरोपींना शिक्रापूर पोलिसांनी तत्काळ अटक केली असून त्यांच्याकडे तब्बल पंधरा एटीएम, एटीएम खोलण्याच्या चाव्या, चव्वेचाळीस हजार पाचशे रुपये रकमेसह शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे.
कोरेगाव भीमा येथील लिंब चौकातील एटीएम दोघा युवकांनी फोडून त्यातील रक्कम लंपास केल्याची माहिती सदर एटीएम एजन्सी कंपनीला मिळाली त्यांनी तातडीने शिक्रापूर पोलिसांना याबाबत माहिती देत त्यांच्या सीसीटिव्ही मध्ये कैद झालेल्या दोघा युवकांचे फोटो शिक्रापूर पोलिसांना पाठवले त्यांनतर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके, पोलीस नाईक श्रीमंत होनमाने, आत्माराम तळोले अमोल दांडगे, जितेंद्र मांडगे यांनी सदर ठिकाणी जात पाहणी केली असता कोरेगाव भिमा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फुटलेले आणि त्यातील रक्कम चोरून नेल्याचे निदर्शनास आले, दरम्यान शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने एटीएम एजन्सीकडून फोटो मिळालेल्या आरोपींचा परिसरामध्ये शोध घेतला असता कोरेगाव भिमा येथिल पुणे नगर महामार्ग लगत आर जे १४ जि एच ३९५५ क्रमांकाचा संशयित कंटेनर आणि त्यामध्ये संशयित हालचाली करणारे दोन युवक दिसून आले, पोलिसांनी या दोघांची झडती घेतली असता दोघांकडे वेगवेगळ्या बँकेचे तब्बल पंधरा एटीएम कार्ड, एटीएम उघडण्याच्या चाव्या तसेच एटीएम फोडून चोरलेली चव्वे चाळीस हजार पाचशे रुपये रक्कम मिळून आली यावेळी पोलिसांनी त्यांच्या जवळील सर्व साहित्य व रक्कम जप्त करत दोघांना देखील ताब्यात घेतले. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक जितेंद्र केशव मांडगे वय ३२ वर्षे रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी तारिफआस महम्मद खान वय २७ वर्षे व रईस नस्सर अहमद वय ३२ वर्षे दोघे रा. पिनंगबन ता. पुन्हाना जि. नुहू राज्य हरियाणा या दोघांवर गुन्हे दाखल करत अटक केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वैभव पवार व पोलीस हवालदार प्रशांत गायकवाड हे करत आहे.
ए टी एम सुरक्षेबाबत बँकांनी जागृत राहून तेथे सुरक्षा रक्षकांची नेमणूक करून जनतेच्या पैशाची सुरक्षितता जपण्यासाठी प्राधान्य द्यायला हवे याबाबत बँका गंभीरतेने विचार करून सुरक्षा रक्षकांची नेमणूक करतील का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे