तातडीने रस्ता दुरुस्त करण्यात यावा अन्यथा महामार्गावर आंदोलन करण्यात येईल – उपसरपंच शुभांगी शेळके
कोरेगाव भीमा – शिक्रापूर – चाकण महामार्ग चौफुला ( ता.शिरूर) येथे वाहन चालक व प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार घडत असून सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून महामर्गावर खड्डे आहेत की खड्ड्यात महामार्ग आहे असा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे.
या रस्त्यावरून वाहन चालकांना व प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ग्रामपंचायत पिंपळे जगताप कार्यालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्र व्यवहार केला असून याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही असे उपसरपंच शुभांगी शेळके यांनी सांगितले. या रस्त्यावर ना व्यवस्थित साईड पट्टे, ना रिफ्लेक्टर,ना सिग्नल ना सूचना फलक सगळा भोंगळ कारभार दिसून येत आहे.या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांना काय ते खड्डे ? काय तो रस्ता ? काय तो सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार .. सगळं कसं .. वाऱ्यावर सोडलं ?? असा प्रश्न पडत आहे.
चाकण व रांजणगाव औद्योगिक वसाहतीस जोडणारा तसेच मोठ्या प्रमाणात मालाची वाहतूक असणारा महामार्ग मात्र सध्या प्रवशांसह वाहनचालकांची डोके दुखी ठरला आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
चौफुला येथील चौकात रस्ता दु भाजक असून त्यावरती कोणत्याही प्रकारचे रिफ्लेक्टर व दूभाजक दर्शविणारे फलक नसल्याने रोज अपघात होत आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाला ग्रामपंचायत मार्फत पत्र व्यवहार केला असून कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही.लवकरात लवकर ही दुरुस्ती करावी अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल – उपसरपंच
शुभांगी शेळके,ग्राम पंचायत पिंपळे जगताप