तुमच्या हक्काच्या कारखान्याची माती केली…
मांडवगण फराटा (ता.शिरूर)“तुमच्या आमदाराने खासगी कारखाना व्यवस्थित चालवला, पण तुमच्या हक्काच्या कारखान्याची माती केली. तुम्ही म्हणाल, आता काय बोलताय, आधी मतं तुम्हीच द्यायला लावली. मला काय माहीत हा दिवटा असा उजेड पाडेल,” अशा शब्दांत शेतकऱ्यांशी संवाद साधताना अजितदादांनी अशोक पवारांची खिल्ली उडवली आहे. ते शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे शेतकरी मेळाव्यात अजित पवार बोलत होते.
या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आमदार अशोक पवारांचा समाचार घेत घोडगंगा कारखाना चालवायला जमत नसेल तर नवीन संचालक मंडळ आणू किंवा प्रशासकाची नेमणूक करू, शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये म्हणून लवकरच घोडगंगा कारखाना संकटातून बाहेर काढणार, असे म्हणत अशोक पवार वेडवाकडं चालत असल्याची टीका अजित पवारांनी ( Ajit Pawar)केली.
आपल्या भागात पिकवलेला ऊस आपल्याच कारखान्यात जावा, अशी अपेक्षा असते. आता तुमचा ऊस लगतच्या भागातील कारखान्यात जातोय. त्यांचा काटा चांगला आहे. मात्र, ऊस देताना काटा नक्की चेक करा, बरेच कारखानदार काटा मारतात. आपण कष्टाने, घाम गाळून पिकवलेला ऊस आहे. त्यात आपली फसवणूक होणार नाही, यासाठी काटा तपासत चला, असा सल्ला अजित पवारांनी शेतकऱ्यांना दिला.
फळबाग, भाजीपाला अशी विविध प्रकारची शेती मी करतो. वेळ मिळेल तेव्हा शेतात जातो. मात्र, कामाच्या व्यापामुळे सध्य मला शेतीकडे वेळ देता येत नाही. परंतु शेतकऱ्यांच्या समस्या मला समजलेल्या आहेत, त्या मी नक्की सोडवणार, असे अजित पवार म्हणाले.
दिसायला चांगला, मिशांना पिळ, राजबिंडा चांगलं काम करेल ..आमच्याही चुका झाल्या.. अजित पवार यांच्याकडून खासदार कोल्हेंचा समाचार – अमोल कोल्हेंचा समाचार घेताना अजित पवार म्हणाले की, अगोदर मीच तुमच्याकडे डॉक्टर अमोल कोल्हे (Dr Amol kolhe) यांना मतदान करा म्हणून तुमच्याकडे विनंती करायला यायचो. त्यांना मी दुसऱ्या पक्षातून घरी नेऊन, पक्षात घेऊन, तिकीट देऊन, निवडून आणलं. मला वाटलं वत्कृत्व चांगलं आहे. दिसायला राजबिंडा आहे. चांगलं काम करतील. दिसायला चांगला… मिशांना पिळ दिला… राजबिंडा गडी पाहिला की आपण त्याला मत देतो. त्यांना उमेदवारी देऊन, प्रचार करून निवडून आणतो त्यात आमच्याही चुका झाल्या आहेत. शेवटी त्यांना त्या भागातली विकासाची कामं करायची आवड आहे का हे महत्त्वाचं असतं.
आम्हाला काही लोकांच्या मनातलं ओळखता आलं नाही. आम्हाला वाटलेलं की हा (खासदार अमोल कोल्हे) चांगला निघेल. पण त्याच्या डोक्यात काय चाललंय. हे कळायला काही मार्ग नाही.