Monday, October 7, 2024
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रअन्यथा शिवद्रोही राज्यपालांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही : संभाजी ब्रिगेड

अन्यथा शिवद्रोही राज्यपालांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही : संभाजी ब्रिगेड

अन्यथा शिवद्रोही राज्यपालांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही : संभाजी ब्रिगेड

पुणे – अखंड भारताचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी अवमानकारक वक्तव्य केलेले आहेत. आता महाराष्ट्राविषयी चुकीची भाषा वापरल्याने त्याविषयी राज्यभर चीड निर्माण होत आहे. राज्यपाल या पदाची गंभीरता त्यांच्याकडे नाही. त्यांनी आपल्या मर्यादा सांभाळल्या नाहीत तर शिवद्रोही राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला. तसेच राज्यपाल कोशारी यांनी तात्काळ महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी काळे यांनी केली.

काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, राज्यपाल भगतसिंग कोशारी एका विशिष्ठ पक्षाच्या बाजूने वागत आहेत. राज्यपाल हे संविधानात्मक पद असताना त्याची गंभीरता त्यांच्याकडे दिसत नाही. त्यामुळे त्यांनी चुकीची वक्तव्य करण्याचा सपाटाच चालू केलेला आहे. सुरुवातीला महात्मा जोतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या विषयी चुकीची भाषा वापरली. त्यांचे लग्न कमी वयात झाल्याची आणि नको ती भाषा वापरली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांविषयी देखील अवमानकारक भाषा वापरलेली होती. आता महाराष्ट्रातील जनतेचा राज्यपालांनी अपमान केला आहे. गुजरात व राजस्थान मधील नागरिकांमुळेच मुंबईला महत्त्व असल्याचे ते म्हणाले आहेत. वास्तविक महाराष्ट्र फोडण्याचे कारस्थान करणाऱ्यांविरोधात राज्यातील लढवय्ये हुतात्मे झालेत. या सगळ्यांचा हा अपमान करण्याचे काम राज्यपालांनी केलेले आहे.

भगतसिंह कोश्यारी यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्यापासून ते पक्षपातीपणाने वागत आहेत. भाजपाच्या बाजूने आपला निर्णय अप्रत्यक्षपणे देत असल्याचे अनेक उदाहरणातून स्पष्ट झाले आहे. त्यापैकी एक उदाहरण म्हणजे कालचा निर्णय मुंबई विद्यापीठांमधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला राजर्षी शाहू महाराजांचे नाव देण्याची तमाम महाराष्ट्रातील जनतेची मागणी असताना देखील शाहू महाराजांचे नाव न देता सावरकरांचे नाव देण्याचा सुचना राज्यपालांनी दिल्या आहेत. राज्यपाल या पदाची गरिमा त्यांनी राखली नाही. त्यामुळे सध्याचे राज्यपाल त्यांच्या वागणुकीमुळे चेष्टेचा विषय बनले आहेत. त्यांनी महाराष्ट्राचा, तसेच महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी त्वरित माफी मागावी. अन्यथा त्यांच्या विरोधात संविधानिक मार्गाने अतिशय तीव्र स्वरूपाचे आंदोलन करुन तसेच कायदेशीर पद्धतीने विरोध करणार आहोत. त्यामुळे राज्यपालांनी तात्काळ महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी अन्यथा त्यांना महाराष्ट्रभर त्यांना फिरू देणार नसल्याचा इशारा काळे यांनी दिला.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!