सातारा प्रतिनिधी हेमंत पाटील
सातारा – राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंय तापलंय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळं मोठी खळबळ उडाली. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यात सत्तांतर झालं. एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत (BJP) मिळून राज्यात सत्ता स्थापन केली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. शिंदे हे मुख्यमंत्री बनल्यावर त्यांना शिवसेनेचे नगरसेवक, नेते, पदाधिकारी, खासदार यांचा मोठा पाठिंबा मिळताना दिसून येत आहे. त्यातच आता साताऱ्याचे शिवसेना (Shiv Sena) जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना वाढदिवसादिवशी ‘जय महाराष्ट्र’ करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिलाय. मी शिवसेनेतचअसून पक्ष सोडलेला नाही, असं सांगत एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असल्यानं विकासकामे होण्यासाठी मी त्यांना पाठिंबा देत असल्याचं जाधव यांनी सांगितलं. मागील आठवड्यात शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केला असल्यानं उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के बसत आहेत. सातारा जिल्ह्यातील अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांना पाठिंबा दर्शवलाय. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पाठिंबा दिल्याने उद्धव ठाकरेंच्या गटाला हा एक मोठा धक्का बसणारआहे. चंद्रकांत जाधव हे अनेक वर्षांपासून शिवसेनेत आहेत. त्यांनी उपजिल्हाप्रमुखपदही भूषविलं आहे. सध्या त्यांच्याकडं जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिवसेनेचं जिल्हाप्रमुखपद होतं.