कोरेगाव भिमा (ता.शिरूर) राज्यात लक्षवेधी ठरलेल्या शिरूर लोकसभा मतदार संघाची निवडणुक आणखी रंगत येणार असून स्वराज्य राष्ट्रनिर्माण सेना पक्षाच्या वतीने निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात येत असल्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेशसिंह ढेरंगे यांनी दिली यामुळे सध्या शिरूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे विद्यमान खासदार डॉ अमोल कोल्हे यांना धोबी पछाड करण्यासाठी चंग बांधला आहे तर शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील निवडणुकीसाठी इच्छुक असून शिवबंधन सोडत घड्याळ हाती बांधून खासदारकीची अचूक वेळ साधणार का ? अशी चर्चा रंगत असताना या मतदार संघात एक मोठा ट्विस्ट आला असून शिरूर लोकसभा मतदार संघात इच्छुक असणाऱ्या सर्व परिचित राजकीय व्यक्तीने स्वराज्य राष्ट्रनिर्माण सेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची गुप्त भेट घेत तब्बल सव्वादोन सविस्तर चर्चा करत आपणही लढण्यास इच्छुक असल्याची बोलणी या उमेदवाराने केली आहे.
अनेक ठिकाणी आपल्या भाषणाने श्रोत्यांवर छाप टाकणारा व दिलदार मनाचा,गावाकडचा रांगडा गडी व राजकारणात अतिशय चाणाक्ष व तरबेज असणारा, समोरच्यावर अचूक डाव टाकत आस्मान दाखवणारा हा उमेदवार शिरूर लोकसभा मतदार संघात स्वराज्य राष्ट्र निर्माण सेना पक्षाच्या वतीने लढल्याने निवडणूक तिरंगी होण्यासह चुरशीची होणार असून राज्यातील लक्षवेधी निवडणूक होणार आहे.
रयत हेच आमचे दैवत अशी कृतीयुक्त वाटचाल करणाऱ्या पक्षात सर्व समाजघटकांना स्थान देण्यात आले असून समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या स्वराज्य राष्ट्रनिर्माण पक्षाच्या वतीने शिरूर लोकसभा मतदार संघात जोरदार तयारी करण्यात येत आहे.आगामी निवडणूक लढवायची असा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी चंग बांधला असून शिरूर लोकसभा आता तिरंगी होणार आहे.