छत्रपती शंभुराजांनाच भाऊ मानून बांधली रक्षासूत्रे
कोरेगाव भीमा – वढू बुद्रुक ( ता.शिरूर) हिंदवी स्वराज्याचे दुसरे अधिपती असलेल्या स्वराज्यरक्षक धर्मवीर श्री शंभुछत्रपतींनाच राखी बांधून वढूतील स्त्रीशक्तीने एक नवा अध्याय रचला. भाऊ-बहिणीच्या प्रेमाच्या नात्यास भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचेच प्रकट रूप मानला गेलेला रक्षाबंधनाचा दिवस वढू बुद्रुकमध्ये काहीश्या आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.श्रावण पौणिमेच्या म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या पवित्र नात्यातील सुमधुर व मांगल्याचा महोत्सव, बहीण भावाला दीर्घायुष्य व शुभ चिंतन करतो तर भाऊ बहिणीच्या सुखा दुःखातील पाठीराखा ,तिच्या आयुष्यातील कठीण प्रसंगात खंबीर साथ देणारा स्नेहमधुर सोहळ्यातील मंगल्याचे प्रतिक असलेली राखी किंवा रक्षासूत्र हातात बांधत असते, भावाच्या दीर्घायुष्याची कामना करत त्याचे औक्षण करत असते.
स्त्रियांचे (आया-बहिणींचेच) व स्वराज्यातील रयतेचे आणि संपूर्ण हिंदुस्थानाच्या अस्मितेचे रक्षण करण्यासाठी वयाच्या अवघ्या ३२व्या वर्षी धगधगत्या राष्ट्रयज्ञकुंडात उडी घेणाऱ्या शंभुराजांसारखा नव्हे नव्हे शंभुराजाच आमचा भाऊ असावा, या भावनेने वढूतील मातृशक्तीने कालची श्रावण पौर्णिमा साजरी केली.
धर्मवीर शंभुछत्रपतींनी त्यांच्या आयुष्यात देव-देश-धर्मासाठी अखंडपणे झगडत राहत, अखेरीस प्राणही दिले, आपले कर्तव्य पूर्ण केले. आता आम्हीं त्यांच्या मानस भगिनी त्यांच्या कार्याचा व कीर्तीचा सुगंध देशभर दरवळत राहावा म्हणून वेळ देऊन कष्ट करु, शंभुराजांसारखीच भविष्यातील पिढी घडावी म्हणून आपल्या मुलाबाळांवर, वढूच्या भविष्यावर संस्कार करुन शंभुविचारांचे रक्षण करु अशी संकल्प प्रतिज्ञा करुन शंभुवंदनेने कार्यक्रमाचा समारोप झाला.
शंभुचेतना जागरण अभियानाच्या वढू बुद्रुक ग्रामप्रमुख कौसल्या यशवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या “कर्तव्य रक्षाबंधन” कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी संगिता आरगडे, मीना भंडारे, नयना आरगडे, अंजली देशमुख, अर्चना शिवले, शोभा देशमुख, मंदा दीक्षित, साक्षी सणस, भक्ती देशमुख यांनी कष्ट घेतले तर किरण आरगडे , भाऊसाहेब शिवले यांनी विशेष सहकार्य केले. खास या कार्यक्रमास अनुभवण्यासाठी अंबेजोगाई वरुन आलेल्या दिनेश जोगदंड यांची विशेष उपस्थिती लाभली.