यापुढे महापुरुषांचा अवमान महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही, असा इशारा रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दिला.
कोरेगाव भीमा – दिनांक १३ डिसेंबर
पेरणे ( ता. हवेली) येथे एक जानेवारी २०२३ला होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन सोहळा तयारीच्या पार्श्वभूमीवर आनंदराज आंबेडकर यांनी विजय स्तंभास भेट देत अभिवादन करुन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. तसेच पत्रकारांशीही संवाद साधला. यावेळी सध्या राज्यभरात गाजत असलेल्या महापुरुषांचा अवमान प्रकरणी बोलताना ते म्हणाले, सध्या महापुरुषांचा अवमान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून घालून दिलेल्या स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या तत्वातील बंधुत्व संपवण्याचा प्रयत्न काही जणांकडून होतोय, हा देशाच्या एकात्मतेलाही धोका निर्माण होत असून यापूढे महाराष्ट्रातील जनता महापुरुषांचा अवमान सहन करणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला.
दरम्यान येत्या एक जानेवारीला मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी पेरणे येथे विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणार असून प्रशासनाने त्यासाठी आवश्यक सोयीसुविधा पुरवाव्यात, असेही आवाहन त्यांनी केले. तसेच येथील विजयस्तंभ परिसराच्या विकासाबाबत राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जात नसल्याबददलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे केंद्रीय सचिव संजय बावधनकर, रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे, रिपब्लिकन कामगार सेना प्रदेशाध्यक्ष युवराज बनसोडे, कमलेश चाबुकस्वार, सचिन कडलक, काजल अहिरे, अँड.अतुल कांबळे, शुद्धोधन मोरे, राकेश गायकवाड, आदी उपस्थित होते.