पुणे – पुण्यात रक्षकच जर भक्षक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील लोणी काळभोर पोलिस स्टेशनमध्ये हा प्रकार घडला. पोलीस ठाण्यातच अफरातफर करत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या दुचाकी विकण्याचा प्रताप केला. या प्रकरणी पुणे शहर पोलीस दलातील दयानंद गायकवाड, संतोष आंदुरे, तुकाराम पांढरे, राजेश दराडे या पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
कायद्याचे रक्षक भक्षक बनले तर ? कुंपणानेच शेत खाल्लं तर ? मग दाद कोणाकडे मागायची ? कुंपणानेच शेत खाल्ल्याचा, असाच काहीसा प्रकार पुण्यात घडला आहे. पुण्यातच पोलिसांनी कायदा मोडत पोलिस स्टेशनमध्येच.चोरी केली आहे,
मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलिसांनी दुचाकी चोरीप्रकरणी एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरीला गेलेल्या दुचाकी हस्तगत केल्या होत्या. या आरोपीची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. या आरोपीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच दुचाकी परस्पर विकायला सांगितल्याची कबुली दिली.या गाड्या स्क्रॅपच्या असल्याचं सांगत पोलीस कर्मचाऱ्यांनीच भंगार बाजारात विकायला सांगितल्ल्याचं आरोपीनं सांगितलं आहे.काही दिवसांपूर्वी उरुळी कांचन पोलिस चौकी हे स्वतंत्र ग्रामीण पोलिस स्टेशन झाल्यानंतर बिनधनी वाहने, चोरीची वाहने, गुन्ह्यातील, अपघातातील, विना नंबरची वाहने ही लोणी काळभोर पोलिस स्टेशन येथे स्थलांतरीत करायची होती. ही वाहने ठेवण्यासाठी लोणी काळभोर पोलिस स्टेशनला वनविभागाकडून जागा देण्यात आली आहे.
आरोपीला या गाड्या स्क्रॅपच्या असल्याचे सांगत पोलिस कर्मचाऱ्याने बाजारात विकण्यास सांगितले होते. स्वत: च्या आर्थिक फायद्यासाठी आणि लाभासाठी या पोलिस कर्मचाऱ्यांनी आरोपीला ही गोष्ट करण्यास भाग पाडले होते. त्यामुळे या प्रकरणात या कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी वारंवार बोलावण्यात आले होते. मात्र त्यांनी चौकशीसाठी उपस्थिती लावली नाही. परिणामी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी या कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.सोमवारी या चार पोलिस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची ऑर्डर पोलिस उपायुक्त यांनी जारी केली.