रांजणगाव येथे मनोज जरांगे पाटील यांनी केली महागणपतीची आरती
रांजणगाव गणपती (ता.शिरूर) छत्रपती शिवाजी महाराज की जय…..हर हर महादेव …एक मराठा …लाख मराठा.. अशा घोषणा देत भगवे झेंडे, भगव्या टोप्या घातलेले असंख्य मराठा बांधव सहभागी झाले असून मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील Manoj Jarange patil) भगव्या वादळाच्या महापुरासह शिरूर तालुक्यात दाखल झाले आहे. शिरूर तालुक्यात त्यांचे भव्य असे स्वागत करण्यात आले तर महागणपतीची आरती मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाली.
शिरूर तालुक्यात क्रेनला एकवीस फुटांचा भाला मोठा हार ,फुलांची उधळण , छत्रपती शिवाजी महाराज की जय…एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला . पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात मनोज जरांगे पाटील यांच्या सह मराठा बांधवांचे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात स्वागत होत आहे.ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत.
महामार्गावर मराठा बांधवांची नाष्टा ,जेवण, पिण्याची पाणी, पार्किंगची सर्व ठिकाणी अतिशय उत्कृष्ट नियोजन करण्यात आले आहे. पुण्याच्या दिशेने भगव्या वादळाचा महापूर झेप घेत असून पोलीस खात्याच्या शांतता व सुरक्षिततेची मोठ्या प्रमाणावर काळजी घेण्यात येत असून वाहतुकीचे अतिशय उत्तम नियोजन करण्यात आले आहे.पुणे नगर महामार्गावरील गावांमधील ग्रामस्थांनी अतिशय कौतुकास्पद कामगिरी केली असून पुणे मुंबईच्या दिशेने कूच करणाऱ्या भगव्या आंदोलकांना सर्व सोयी सुविधा पुरवल्या जात आहेत.रांजणगाव,कोंढापुरी,शिक्रापूर,सणसवाडी,कोरगाव भिमा, पेरणे, लोणीकंद, कटकेवाडी, विठ्ठलवाडी व वाघोली परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने पाणी बाटल्यांचे बॉक्स, बिस्किटे, चहा, फरसाण ,मसाला ताक, गरमगरम बाजरीची भाकरी, बेसन , मिरचीचा खर्डा, व इतर सुग्रास अन्नपदार्थ तसेच फूड पॅकेजिंग सुद्धा करण्यात आली आहे.