दशक्रिया विधीत पुन्हा जिल्हा परिषद शाळेला ११ हजार
शिक्रापूर – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी वेळी ज्यांचे प्रसादाचे किर्तन झाले त्या संत कान्होराज महाराजांच्या केंदूर गावात संतश्रेष्ठ कान्हुराज महाराज पाठक महाराजांचे मंदिरातील पुरातन विठ्ठल रखुमाई मुर्तीची प्रतिष्ठापना भागवताचार्य विष्णू महाराज चक्रांकीत यांच्या हस्ते मोठ्या जोरजल्लोषात संपन्न झाली. विशेष म्हणजे गावाने ग्रामसभेत ठरविल्याप्रमाणे तब्बल दोन दिवसांचा हा भरगच्च कार्यक्रम कुठलीही लोकवर्गणी वा देणगी न काढता यशस्वी झाला. विशेष म्हणजे याच काळात गावातील महादेववाडीतील एका दशक्रिया विधीत वस्तीतील जिल्हा परिषद शाळेला ११ हजार देणगी देवून गावाने आपला धार्मिक देणग्यांवरील बंदीचा निर्णय अमलात तर आणलाच शिवाय शैक्षणिक देणग्यांचे प्रोत्साहनही सुरू झाले.
केंदूरचा नावलौकीक सातशे वर्षांपूर्वीपासून संतश्रेष्ठ कान्हुराज पाठक यांच्यामुळे संपूर्ण राज्य आणि देशाभरात आहे. काशिचे ते प्रसिध्द विद्वान ब्राम्हण म्हणूनही त्यांचेकडे संपूर्ण देशाभरातून अनेकजण विद्याप्राप्तीसाठी येत असल्याचा इतिहास आहे. विशेष म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज व त्यांचे सर्व संत भावंडे त्यांना काका म्हणून संबोधत असत व त्यांचे येणे-जाणे कान्हुपाठकांच्या केंदूर देऊळवाड्या राहिल्याचे अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत. त्या अनादी काळापासून याच देऊळवाड्यात जुनी विठ्ठल-रखुमाईची मुर्ती नव्याने प्रतिष्ठापित करण्याची सुचना अमळनेर (जि.जळगाव) संस्थानाचे प्रमुख प्रसाद महाराज अमळनेरकर यांनी केल्यावरुन भागवताचार्य विष्णू महाराज चक्रांकीत यांचेहस्ते मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी संतश्रेष्ठ कान्हुराज पाठकांचे वंशज शरदकाका, सारंग, श्रीकांत, नंदकुमार, वासुदेव, विजय, सतीश राजपाठक व त्यांचे सर्व परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान कार्यक्रमासाठी संत कान्होराजपाठक पंढरपूर दिंडी सोहळ्यातील सर्व वारकरी, ग्रामस्थ तसेच संपूर्ण गावातील सर्व स्तरांतील आबालवृध्दांनी सहभाग घेतला. तब्बल दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यात होमहवन, भव्य शोभायात्रा, भजन, काकड आरती, जागर, किर्तन, नगरप्रदक्षिणा आदी सर्व मोठ्या उत्साहात संपन्न झाले. विशेष म्हणजे गावाने ठरविल्याप्रमाणे या संपूर्ण मोठ्या कार्यक्रमात कुठेही देणगी-वर्गणी मागितली गेली नाही हे विशेष. संपूर्ण पौरोहात्य श्रीनिवास, श्रीपती, श्रीरंग कर्डेकर व हरिष कुलकर्णी यांनी केले.
बुधवारी टँकरमुक्त पाणीदार व धार्मिक देणगीमुक्त केंदूर भेटीला जलतज्ञ राजेंद्रसिंहजी – दोनच वर्षात संपूर्ण गावची पाणीपातळी तब्बल तीन मिटरने वाढवून दाखविलेल्या केंदूरचे हे यश पाहण्यासाठी व गावच्या सर्व १२ वाड्यावस्त्यांवरील ग्रामस्थांना भेटायला मॅगेसेसे पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंहजी राणा हे संपूर्ण दिवसभर उद्या (ता.२४) केंदूर येथे येणार आहेत. संध्याकाळी ते गावातील आबालवृध्दांसह महिलांशी ते संध्याकाळी पाच ते सात या वेळात संवाद साधणार असल्याची माहिती सरपंच सुर्यकांत थिटे, उपसरपंच विठ्ठल ताथवडे व यशदाचे डॉ.सुमंत पांडे यांनी दिली.
तीव्र दु:खातही ११ हजार देणगी जिल्हा परिषद शाळेला महादेववाडी येथील एका युवकाचे दहा दिवसांपूर्वी अचानक निधन झाल्याने संपूर्ण वस्ती व साकोरे परिवार तीव्र धक्क्यात होता. परिवाराची आर्थिक स्थितीतर अगदीच जेमतेम असताना साकोरे परिवाराने अन्य कुठेही धार्मिक देणगी टाळून वस्तीतील जिल्हा परिषद शाळेला ११ हजार रुपये देणगी भर दशक्रिया विधीतच दिल्याने उपस्थितांचेही डोळे पाणावले आणि गावाच्या शिक्षणाप्रति पडलेल्या पाऊलालाही बळकटी मिळाली.