दहा रुपयांची फाटकी नोट घेण्यास नकार दिल्याचा राग आल्याने सव्वीस वर्षांच्या तरुणाने दुकानच ऑईल टाकून पेटवून दिल्याची खळबळजनक घटना अहमदनगर शहरातील कोठी चौकात घडली.
दुकान पेटवत नुकसान करणाऱ्या या आरोपीला पोलिसांनी सोमवारी (दि.२९) रात्री अटक केली आहे.विजय दिलीप झेंडे (वय २६, रा. सात खोल्या, नगर कॉलेजजवळ, अहमदनगर) असे या आरोपीचे नाव आहे. याबाबत रंजना अजय बसापुरे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी बसापुरे यांचे कोठी चौकातील पाटील हॉस्पिटल समोर महावीर दुध डेअरी व जनरल स्टोअर या नावाचे दुकान आहे. रविवारी (दि.२८) बसापुरे या दुकानात असताना आरोपी विजय झेंडे दुकानात आला.
त्याने वस्तू खरेदीसाठी १० रुपयांची फाटकी नोट दिली. ती घेण्यास बसापुरे यांनी नकार दिला. त्याचा राग येवून आरोपी झेंडे याने रात्री १० च्या सुमारास ऑईल घेवून येत ते दुकानात ओतत दुकानात आग लावली.
👉 हे पण वाचा – मोकळ्या जागेवरून झालेल्या वादात आई-मुलाची हत्या, वडील जखमी
या आगीत दुकानातील लाकडी काऊंटर, लहान मोठ्या बरण्या व इतर साहित्य असे २० हजारांचे साहित्य जळून नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी विजय झेंडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.