फुले, शाहू, आंबेडकर यांची विचारधारा सारखीच – माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
तळेगाव ढमढेरे : (प्रतिनिधी) : फुले, शाहू आंबेडकर यांची विचारधारा सारखीच असून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून ती विचारधारा पुढे नेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
तळेगाव ढमढेरे (ता.शिरुर) येथील महात्मा फुले उपबाजार कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सोहळ्याचे आयोजन महात्मा फुले पुण्यतिथी सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून वळसे पाटील यांनी, “महात्मा फुलेंचे पुरोगामी विचार जोपासणे गरजेचे असून लोकशाही आणि राज्यघटना यांची जोपासना करून ऐक्य, एकी व प्रगतीचा विचार पुढे घेऊन जाणे गरजेचे आहे”.
याप्रसंगी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी,” माणूस म्हणून आत्मभान देण्याचं काम क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले आहे. माता-भगिनींना स्वाभिमानाने जगण्यासाठी फुले दाम्पत्यांनी शिक्षणाची कवाडं खोलली. जात श्रेष्ठतेपेक्षा गुण श्रेष्ठता महत्त्वाची असून हे गुण अंगीकारण्यासाठी विज्ञाननिष्ठ विचारांची गरज आहे. तर्कशुद्ध व विज्ञाननिष्ठ पद्धतीने प्रश्न विचारणे म्हणजेच महात्मा फुलेंची विचारधारा पुढे नेण्यासारखे आहे. समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आरक्षणाची गंगा तळागाळातील लोकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. पुरोगामी व राष्ट्राच्या प्रगतीचा विचार मनात रुजणे आवश्यक असल्याचेही खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले. तर यावेळी बोलताना माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की,” महात्मा फुलेंनी वंचितांसाठी संघर्ष केला ही समाजाला मिळालेली फार मोठी देणगी असून समाजाशी संघर्ष करून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचे धाडसी पाऊल उचलले हे कार्य व कर्तुत्व अभिमानास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा बँकेचे संचालक दिगंबर दुर्गाडे, माजी आमदार पोपटराव गावडे, सूर्यकांत पलांडे, जि. प.महिला व बालकल्याण विभागाच्या माजी सभापती सुजाता पवार, शिरुर बाजार समितीचे सभापती अँड. वसंतराव कोरेकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, डॉ. वर्षा शिवले, शिरूर पंचायत समितीच्या माजी सभापती आरती भुजबळ, मोनिका हरगुडे, शिरूर बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, अरविंद ढमढेरे, माजी उपसभापती अनिल भुजबळ, मानसिंग पाचुंदकर, प्रदीप वळसे पाटील, डॉ. एकनाथ खेडकर, पोपट भुजबळ, सरपंच अंकिता भुजबळ, उपसरपंच मच्छिंद्र भुजबळ, भुजबळ,सदाशिव पवार, नंदकुमार पिंगळे, सोपान भाकरे, विद्या भुजबळ, सरपंच रमेश गडदे, सणसवाडीच्या माजी सरपंच स्नेहल भुजबळ,किरण बनकर, गणेश तोडकर, बाळासाहेब लांडे, रमेश भुजबळ, संभाजी भुजबळ, सोमनाथ कुदळे, महेश भुजबळ, राकेश भुजबळ, भरत भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात रांजणगाव गणपतीचे आदर्श सरपंच भिमाजी खेडकर व श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग राऊत यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्रांतीसुर्य महात्मा फुले पुण्यतिथी सोहळा समितीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब नरके यांनी केले. शिरूर पंचायत समितीच्या माजी सभापती आरती भुजबळ यांनी स्वागत केले. आकाश वडघुले व निलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन केले तर प्राध्यापक माणिक खेडकर यांनी आभार मानले.